रावेरात दरोड्याचा डाव उधळला; पोलिसांच्या सतर्कतेने दोन संशयित जेरबंद !

पालकडून रावेरकडे येणाऱ्या टोळीचा पाठलाग; ईको वाहनातून तलवार, टॉमी, मिरची पूड व बनावट नोटा जप्त
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव रावेर पोलिसांनी हाणून पाडला. पालकडून रावेरच्या दिशेने संशयास्पदरीत्या येणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अन्य तीन संशयित फरार झाले आहेत. दरम्यान, पाठलागादरम्यान चारचाकी वाहन चिखलात अडकल्यानंतर जमावाने पकडलेल्या दोघांना मारहाण केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांची जमावाच्या तावडीतून सुटका करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
ही घटना गुरुवारी (दि. ९ जुलै) घडली. पाल येथे कर्तव्यावर असलेले रावेर पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण यांना पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी ईको (एमएच-१९ ईए-२४०३) संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. या वाहनातून सुमारे पाच व्यक्ती रावेरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले.चव्हाण यांनी तातडीने ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. पोलिसांनी दोन पथके तयार करून पाल व रावेरच्या दिशेने रवाना केली.दरम्यान, आभोडा गावाजवळ संशयित वाहनाने दुचाकींना कट मारल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच संशयितांनी वाहन वेगाने चालवत रावेरकडे पळ काढला. मात्र, बऱ्हाणपूर रोडवरील एका शेताजवळ वाहन चिखलात रुतल्याने त्यांचा पळण्याचा प्रयत्न फसला.यावेळी पोलिसांसह नागरिकांनी वाहनाला घेराव घातला. काही संशयित शेतशिवाराचा फायदा घेत फरार झाले, तर दोन जण नागरिकांच्या हाती लागले. जमावाकडून त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून दोघांची सुटका केली व रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
वाहनातून संशयास्पद साहित्य जप्त
पोलिसांनी संशयितांच्या ईको वाहनातून तलवार, टॉमी, लाल मिरचीची पूड, दोरखंड तसेच ५०० रुपयांच्या बनावट नोटा असलेले सुमारे ३ लाख रुपयांचे बंडल जप्त केले. प्राथमिक तपासात ही टोळी रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी निखील प्रवीण पाटील (वय २०) व अल्ताफ जलाल शेख (वय २६, दोघे रा. साईनगर, घोडबंदर रोड, कासारवडवली, ठाणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मेहरबान जहांगीर तडवी (रा. पाल) व त्याचे दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.या संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

