प्रेमविवाहामुळे तणाव; पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गटांत संघर्ष, लाठीचार्ज

नगरसेवक व माजी जि.प. सदस्यांच्या समर्थकांमध्ये पोलीस ठाण्यात राडा; पोलिसांनी केला लाठीचार्ज !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – प्रेमविवाह करून संरक्षणासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आलेल्या नवदाम्पत्याच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. १०) रात्री जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. वाढता तणाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तालुक्यातील एका गावातील युवक आणि शहरातील मेहरूण परिसरातील तरुणी यांनी प्रेमविवाह केला. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने हे नवदाम्पत्य रात्री सुमारे १०.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले. ही माहिती मिळताच दोन्ही कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले.सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, काही वेळातच वाद वाढत गेला आणि शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. अंदाजे ५० ते ६० जण एकमेकांसमोर आल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवला. जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या गोंधळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
या वादात एका विद्यमान नगरसेवकाच्या समर्थकांचा गट आणि एका माजी जिल्हा परिषद सदस्याच्या समर्थकांचा गट आमनेसामने आल्याची चर्चा परिसरात होती. त्यामुळे घटनेची गंभीरता अधिक वाढली.दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाल्याची नोंद नव्हती. पोलिसांकडून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून, उपलब्ध पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

