Monday, July 13, 2026
Homeगुन्हाभुसावळ रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात!

भुसावळ रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात!

भुसावळ रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात!

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ मोहिमेत कारवाई; २१ हजारांचा मोबाईल जप्त, सहा महिन्यांपूर्वीच्या चोरीची कबुली !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) ‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ मोहिमेंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशाची पर्स चोरणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीतील सुमारे २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव सचिन समाधान थाटे (वय ३५, रा. दसरखेड, ता. मलकापूर) असे आहे.

आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी रात्री भुसावळ रेल्वे स्थानकाच्या जळगाव बाजूच्या आऊटर परिसरात सीपीडीएस पथक गस्त घालत असताना संशयिताची हालचाल संशयास्पद वाटली. प्रधान आरक्षक महेंद्र कुशवाहा तसेच कर्मचारी इम्रान खान, संदीप कुमार आणि भूषण पाटील यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.झडतीदरम्यान त्याच्याकडून सुमारे २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. अधिक चौकशीत त्याने सुमारे सहा महिन्यांपूर्वी भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर उभ्या असलेल्या साईनगर शिर्डी–पुरी एक्स्प्रेसमधील एका महिला प्रवाशाची पर्स चोरल्याची कबुली दिली. पर्समधील रोख रक्कम खर्च करून त्यातील मोबाईल विकण्यासाठी घेऊन जात असतानाच तो आरपीएफच्या जाळ्यात अडकला.

आरपीएफच्या सतर्कतेमुळे जुन्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असून, संशयिताला पुढील तपासासाठी जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ मोहिमेमुळे अशा गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई होत असल्याचे आरपीएफने सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या