पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला; मानेवर वार करून गंभीर जखमी!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील कानळदा रस्त्यावर घडली. या घटनेत अकील शेख अजगर (वय २५, रा. खडकी चाळ) यांच्यावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला असून, त्यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलैच्या रात्री अकील शेख हे त्यांचे मित्र जाफर शेख जलील यांच्यासोबत कानळदा रस्त्यावरील एका प्लास्टिक दुकानाजवळ उभे होते. त्यावेळी तन्या उर्फ तन्वीर शेख (रा. गेंदालाल मिल परिसर) हा तेथे आला. पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून त्याने शिवीगाळ करत, “तू मला पैसे दिले नव्हते, आता तुला बघतो,” असे म्हणत कमरेला खोचलेला चाकू काढून अकील शेख यांच्यावर वार केला.या हल्ल्यात अकील शेख यांच्या मानेवर गंभीर जखम झाली. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रकरणी अकील शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यावरून संशयित तन्या उर्फ तन्वीर शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

