Monday, July 13, 2026
Homeजळगावदीपनगर भ्रष्टाचारप्रकरणी अभियंता योगेश इंगळे बडतर्फ

दीपनगर भ्रष्टाचारप्रकरणी अभियंता योगेश इंगळे बडतर्फ

दीपनगर भ्रष्टाचारप्रकरणी अभियंता योगेश इंगळे बडतर्फ
भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

महानिर्मितीच्या दीपनगर औष्णिक – वीज केंद्रातील १ बाय ६६० मेगावॅट रिप्लेसमेंट युनिट प्रकल्पांतर्गत कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अधीक्षक अभियंता (सिव्हिल) योगेश इंगळे यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे प्रकल्पातील प्रशासन, कंत्राटी कामकाज आणि गुणवत्ता नियंत्रणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणाचा मुद्दा विधान परिषदेचे आ. एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. तसेच उर्जामंत्री आणि महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे लेखी तक्रार करून कर्मचारी गृहप्रकल्पातील कथित आर्थिक गैरव्यवहार, निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी केली होती. तक्रारीत मुख्य कंत्राटदार, पोटकंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर संगनमताने शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा

आरोप करण्यात आला होता.

तक्रारीनुसार, कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, जिप्सम प्लास्टरच्या कामात कथित अनियमितता, आरसीसी बांधकामासाठी आवश्यक असलेल्या स्टीलचा कमी वापर, डबल जाळीऐवजी सिंगल जाळीचा वापर, ग्रॅनाइटच्या कामात अतिरिक्त आर्थिक लाभ घेणे तसेच निकृष्ट दर्जाच्या खिडक्या, फरशा आणि पाइपचा वापर केल्याचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

या तक्रारीची दखल घेत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर अधीक्षक अभियंता योगेश इंगळे यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत महानिर्मितीने कठोर भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित इतर अधिकारी, कंत्राटदार आणि पोटकंत्राटदार यांच्या भूमिकेचीही सखोल चौकशी व्हावी, तसेच कर्मचारी गृहप्रकल्पाचे स्वतंत्र तांत्रिक व स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या