Thursday, July 16, 2026
Homeजळगावभरधाव वाळूच्या डंपरने पादचारी तरुणाला चिरडले; दोन्ही पाय चेंदामेंदा, चालक फरार!

भरधाव वाळूच्या डंपरने पादचारी तरुणाला चिरडले; दोन्ही पाय चेंदामेंदा, चालक फरार!

भरधाव वाळूच्या डंपरने पादचारी तरुणाला चिरडले; दोन्ही पाय चेंदामेंदा, चालक फरार!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जळगाव तालुक्यातील खेडी गावात भरधाव वेगाने धावणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने पादचारी तरुणाला चिरडल्याची अत्यंत भीषण घटना बुधवारी रात्री घडली. या अपघातात प्रीतम संभाजी पाटील (वय ३५, रा. श्रीकृष्णनगर, खेडी) यांचे दोन्ही पाय डंपरच्या चाकाखाली आल्याने गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास खेडी गावातील अरुंद रस्त्यावरून भरधाव वेगाने वाळू वाहतूक करणारे डंपर जात होते. त्याचवेळी प्रीतम पाटील हे पायी घरी जात असताना एका डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले आणि डंपर त्यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले.घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी तातडीने प्रीतम यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.दरम्यान, जखमी प्रीतम पाटील हे नाशिक येथील एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरीला असून, काही दिवसांच्या सुट्टीवर आई व भावाला भेटण्यासाठी खेडी येथे आले होते. मात्र घरी परतत असतानाच त्यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला.

अपघातानंतर डंपर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. रात्री उशिरापर्यंत डंपर आणि चालकाचा शोध सुरू होता.या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर आणि ग्रामीण भागातून सर्रास सुरू असलेल्या वाळू वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचा आरोप होत असून, अवैध व बेदरकार वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या