एमआयडीसीतील गोदामावर छापा; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघे अटकेत !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एका गोदामात साठवून ठेवलेला तब्बल १२ लाख १५ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून जप्त केला. या प्रकरणी वकार शेख जब्बार शेख (वय ३२) व धीरज मिश्रा (दोघे रा. शाहूनगर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाला एमआयडीसीतील एम-१२४ सेक्टरमधील एका गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सहआयुक्त (अन्न) दिनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके व आकाश बोराडे यांनी गोदामावर छापा टाकला. तपासणीदरम्यान गोवा ब्रँडचा मोठा गुटखा साठा आढळून आला.या कारवाईत प्रत्येकी ७५ पाऊच असलेली ३,३०० पाकिटे आणि प्रत्येकी २६ पाऊच असलेली १,५०० पाकिटे, अशी एकूण ४,८०० पाकिटे जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत १२ लाख १५ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.
दरम्यान, संशयितांनी हा गुटखा भाडेतत्त्वावरील गोदामात साठवून ठेवला होता. त्यामुळे या प्रकरणात गोदाम मालकाची भूमिका संशयास्पद आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे. तसेच या अवैध साठ्यामागील पुरवठादार, उत्पादक, विक्रेते व इतर संबंधितांची साखळी उघड करून संघटित गुन्हेगारी आणि अवैध आर्थिक व्यवहारांबाबतही सखोल तपास करण्याची सूचना अन्न व औषध प्रशासनाने केली आहे.

