दागिन्यांच्या आमिषाने विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवून अत्याचार, आरोपी अटकेत!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – सोन्याचे दागिने करून देण्याच्या आमिषाने ३० वर्षीय विवाहितेला तिच्या मुलासह पळवून नेत तब्बल दोन महिने डांबून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपी सुदाम भगवान भिल्ल (रा. कलाली, ता. अमळनेर) याला बुधवारी पहाटे पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीपासून विभक्त होऊन आई-वडिलांकडे राहत होती. लाडकी बहीण योजनेचे तसेच मजुरीचे मिळून तिच्याकडे सुमारे ७० हजार रुपये असल्याची माहिती आरोपीला होती. सोन्याचे दागिने करून देतो आणि गरज पडल्यास आणखी पैसेही देईन, असे आमिष दाखवून त्याने तिला अमळनेर येथे बोलावले.मात्र, सोनार गल्लीत न नेता दुसऱ्याच वाहनात बसवून पीडित महिला आणि तिच्या मुलाचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप आहे. जीवे मारण्याची धमकी देत त्यांना बहाळ आणि शिरपूरजवळील विमानतळ परिसरातील एका तांड्यावर नेण्यात आले. तेथे पीडितेला जबरदस्तीने डांबून ठेवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.आरोपी बाहेर गेल्याची संधी साधून पीडितेने मुलासह तेथून पलायन केले. त्यानंतर कमखेडा येथील बहिणीच्या घरी आश्रय घेत तिने संपूर्ण घटना नातेवाइकांना सांगितली. त्यांच्या मदतीने मारवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक साजिद मन्सुरी यांच्या पथकाने केला. तातडीने कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

