जिल्हा परिषदेसमोर दुचाकीस्वाराला लुटणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी- जिल्हा परिषद कार्यालयासमोरील रस्त्यावर दुचाकीस्वाराला अडवून मोबाईल लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक करून लुटीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला असून, मुख्य आरोपीवर यापूर्वीही जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१४ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुस्तकीन शेख सईद (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) हे दुचाकीने जिल्हा परिषद कार्यालयासमोरील रस्त्यावरून जात असताना दोघांनी त्यांना अडवून त्यांच्या ताब्यातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबीने तपासाची सूत्रे हाती घेतली.सूत्रांच्या आधारे पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय मुकेश अटवाल (वय ३५) याला गुरुनानक नगर, शनिपेठ परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार चंद्रकांत रमेश दिवेकर (वय २३) याच्या मदतीने लूट केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी चंद्रकांत दिवेकर यालाही अटक केली.
दोन्ही आरोपींकडून चोरीला गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

