जामनेर हादरले! आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार; ठिय्या आंदोलनानंतर चौघे ताब्यात

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी -जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आदिवासी महिलेवर झालेल्या कथित सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणाने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या पंधरा दिवसांत आदिवासी महिलांवरील दोन गंभीर घटनांमुळे विविध आदिवासी संघटनांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यासमोर सकाळपासून सायंकाळपर्यंत ठिय्या आंदोलन केले. गुन्हा दाखल करण्यात झालेल्या विलंबामुळे आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपींनी गुंगीचे औषध देऊन तिच्यावर कथित अत्याचार केला. त्यानंतर घटनेचे चित्रीकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या घटनेत महिलेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून शेत परिसरात नेऊन बंदुकीचा धाक दाखवत सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत नमूद आहे. या वेळी काही अन्य संशयितांनी चित्रीकरण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पीडितेने १५ जुलै रोजी पतीसह तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले होते. मात्र, पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप करत तिच्या पतीने संतप्त होऊन हातात पेट्रोल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.आदिवासी संघटनांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून, आणखी तीन ते चार संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

