मंत्रालयात नोकरीच्या नावाखाली ५५ लाखांचा गंडा; बनावट ‘न्यायाधीश’ पोलिसांच्या ताब्यात

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मंत्रालयात थेट नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तीन उच्चशिक्षित तरुणांची तब्बल ५५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला एमआयडीसी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. संदेश दशरथ शिरसाठ असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, तो स्वतःला न्यायाधीश असल्याचे भासवत तरुणांचा विश्वास संपादन करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून न्यायाधीशाचे बनावट ओळखपत्र तसेच अंबर दिवा लावलेली कार जप्त केली आहे. मेहरूण येथील हॉटेल व्यावसायिक कुणाल नाईक यांच्या दोन भावांसह एका मित्राला मंत्रालयातील नोकरीचे आमिष दाखवत मोठी रक्कम उकळण्यात आली होती.या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या स्वप्नील जयस्वाल याने स्वतःला मंत्रालयातील बांधकाम विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचा बनाव केला होता. शासनाचा फलक असलेली गाडी, महागडा पेहराव आणि प्रभावी वावर याच्या माध्यमातून त्याने तरुणांचा विश्वास संपादन करून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांच्या पथकाने स्वाती जुनागडे, स्वप्नील जयस्वाल आणि अमित जयस्वाल यांना यापूर्वीच अटक केली होती.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे मुख्य सूत्रधार संदेश शिरसाठ याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले.
विशेष म्हणजे, पोलिसांच्या ताब्यात घेतल्यानंतरही शिरसाठ याने स्वतःला न्यायाधीश असल्याचा दावा करत पोलिसांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सखोल चौकशीत त्याचा बनाव उघडकीस आला. या प्रकरणातील आणखी एका बनावट ‘वकील’ साथीदाराचा पोलीस शोध घेत असून, फसवणूक रॅकेटचा तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.

