‘पाहुणे आपल्या भेटीला’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन संपन्न.

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भुसावळ येथे राबविण्यात येणाऱ्या ‘पाहुणे आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा फिजिओथेरपिस्ट कु. मानसी जयदीप फेगडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी कु. मानसी फेगडे यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडताना यशाचा कोणताही शॉर्टकट नसून सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, वेळेचे योग्य नियोजन आणि स्वतःवरील विश्वास यांच्या बळावरच यश प्राप्त करता येते, असे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत, संघर्षाला घाबरू नये आणि प्रत्येक अडचणीतून नवीन वाट निर्माण करण्याची तयारी ठेवावी, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
फिजिओथेरपिस्ट या नात्याने त्यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक आरोग्याचे महत्त्वही पटवून दिले. नियमित व्यायाम, योग्य बैठक पद्धती, संतुलित आहार, पुरेशी झोप, मोबाईलचा मर्यादित वापर तसेच अभ्यास करताना योग्य पोश्चर ठेवण्याची गरज याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. निरोगी शरीरातच निरोगी मन वसते आणि उत्तम आरोग्य हेच यशस्वी शिक्षणाचे भक्कम आधारस्थान आहे, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून करिअर, उच्च शिक्षण, फिजिओथेरपी क्षेत्रातील संधी तसेच अभ्यासाचे नियोजन याविषयी शंकानिरसन करून घेतले. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या हितगुजामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा व योग्य दिशा मिळाली.
कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ॲड. श्रीमती संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक श्री एस. पी. पाठक, पर्यवेक्षक श्री बी. बी. जोगी, सौ. कांचन राणे, सौ. नेहा पाटील, सौ. हेमलता जावळे, श्रीमती. सुनिता जावळे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी कु. मानसी फेगडे यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

