Saturday, July 18, 2026
Homeजळगावजळगाव जिल्ह्यात खळबळ… ५८ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; ९ परवाने रद्द, २३...

जळगाव जिल्ह्यात खळबळ… ५८ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; ९ परवाने रद्द, २३ निलंबित

जळगाव जिल्ह्यात खळबळ… ५८ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; ९ परवाने रद्द, २३ निलंबित

जळगाव  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                     खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाणे व कीटकनाशके योग्य दरात उपलब्ध व्हावीत आणि कृषी निविष्ठांच्या विक्रीत पारदर्शकता राहावी, या उद्देशाने कृषी विभागाने जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत विविध अनियमितता आढळून आल्याने ५८ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ९ परवाने कायमस्वरूपी रद्द, २३ परवाने निलंबित, तर २६ परवानाधारकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पद्मनाथ म्हस्के आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकांनी खत, बियाणे व कीटकनाशक विक्रेत्यांच्या दुकानांची अचानक तपासणी केली.

तपासणीत गंभीर अनियमितता
तपासणीदरम्यान अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये दैनंदिन विक्री नोंदी अद्ययावत नसल्याचे आढळले. काही ठिकाणी खते व बियाण्यांची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने विक्री, परवान्याच्या अटींचे उल्लंघन, साठ्याची अपुरी नोंद आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे अशा अनेक त्रुटी आढळल्या.

या प्रकरणांमध्ये संबंधित परवानाधारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर सुनावणी घेऊन तपासणी अहवाल, उपलब्ध पुरावे आणि सादर केलेल्या स्पष्टीकरणाची छाननी करण्यात आली. दोष सिद्ध झालेल्या प्रकरणांमध्ये नियमानुसार अंतिम कारवाई करण्यात आली.

चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक कारवाई
विशेष तपासणी मोहिमेत चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक २० कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली. उर्वरित कारवाया जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील कृषी सेवा केंद्रांवर करण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात यापुढेही कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांना आवाहन
खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, कृषी निविष्ठांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि दर्जेदार साहित्य योग्य दरात मिळावे, यासाठी अशा तपासण्या नियमितपणे सुरू राहणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांनी खते, बियाणे किंवा कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत पावती घ्यावी, दरपत्रकाची खात्री करावी आणि कोणतीही अनियमितता आढळल्यास तत्काळ कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या