कारच्या धडकेत माकड ठार दिपनगर जवळील घटना

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी निंभोरा (ता. भुसावळ), दि. १९ जुलै २०२६ – भुसावळ तालुक्यातील दिपनगर निंभोरा येथील बस स्टॉप जवळ रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारने रस्ता ओलांडत असलेल्या माकडाला जोरदार धडक दिली. या अपघातात माकड गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याबाबत माहिती अशी की वरणगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या अज्ञात भरधाव कारने पाच-सहा माकडांचा कळप रस्ता ओलांडत असताना त्यांना धडक दिली. यात एक माकड जोरदार आघाताने रस्त्यावर कोसळले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी तात्काळ माकडाला रस्त्याच्या कडेला हलवून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडले, परंतु धडक इतकी तीव्र होती की माकड बेशुद्ध अवस्थेत होते.
गावातील जिजारसिंग निले यांच्या प्रयत्नाने स्थानिक नागरिकांनी माकडाला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी प्रकाश सरदार यांनी त्वरित वनविभागाचे कर्मचारी राजेश सोनोने यांना घटनेची माहिती दिली. राजेश सोनोने यांनी वनपाल अनिल साळुंके यांना अवगत केले. वनपाल साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेत माकडाला तातडीने पशुवैद्यकीय तपासणीसाठी नेले. मात्र, तपासणी करताच डॉक्टरांनी माकडाला मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरातील प्राणीप्रेमी व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वनविभागाने घटनेची नोंद घेतली असून, अज्ञात कारचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रस्त्यावरील वाहतुकीच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची तसेच वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरी बाळगण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे.

