फैजपूरमध्ये ‘पोलीस काका–पोलीस दीदी’ उपक्रम; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

फैजपूर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या सायबर जनजागृती अभियानांतर्गत मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फैजपूर येथे गुरुवारी (दि. 23) ‘पोलीस काका–पोलीस दीदी’ उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणे आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत सजगता वाढविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमात पीएसआय बोकील, एएसआय आशा तडवी व पोलीस कॉन्स्टेबल सागर सोनवणे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत शाळेत ये-जा करताना घ्यावयाची काळजी, वैयक्तिक सुरक्षितता तसेच उद्भवणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तातडीने पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, आपत्कालीन मदतीसाठी 112 या हेल्पलाइनचा वापर करावा आणि शाळेतील तक्रार पेटीतही तक्रार नोंदवावी, असे त्यांनी सांगितले.
यानंतर विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार समजावून सांगण्यात आले. सोशल मीडियावरील फसवणूक, ऑनलाइन शॉपिंग फ्रॉड, फेक लोन, फिशिंग, सायबर स्टॉकिंग, डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने होणारी फसवणूक तसेच ऑनलाइन बदनामी यांसारख्या गुन्ह्यांची उदाहरणांसह माहिती देत त्यापासून बचावाचे उपायही सांगण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम कार्डचे तपशील, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नये, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला. डिजिटल व्यवहार करताना सतर्कता बाळगणे आणि संशयास्पद लिंक, कॉल किंवा संदेशांपासून दूर राहणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी अधोरेखित केले.
सायबर फसवणुकीची घटना घडल्यास विलंब न करता 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करत विद्यार्थ्यांना जबाबदार आणि जागरूक डिजिटल नागरिक बनण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य वाहिद सर व शिक्षक मलिक आबिद सर यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेसंदर्भातील विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. पोलिसांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले.

