बनावट शालार्थ घोटाळ्यात जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर अटकेत!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बनावट शालार्थ आयडी आणि वैयक्तिक मान्यता प्रकरणातील तपासाला मोठे यश मिळाले असून, जळगाव जिल्हा परिषदेचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणीकर यांना नाशिकरोड पोलिसांनी धुळे येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
तपासात असे समोर आले आहे की, सन २०११ ते २०१५ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकारी कार्यालयात कोणतेही प्रस्ताव प्राप्त नसताना कथितपणे बनावट वैयक्तिक मान्यता देण्यात आली. या बनावट आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत नोंदी करून शासनाकडून वेतन व थकबाकीची रक्कम काढण्यात आल्याचा आरोप आहे.माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी धुळे येथे असल्याची खात्री झाल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने धुळे येथे कारवाई करून शशिकांत हिंगोणीकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणून पुढील चौकशी सुरू करण्यात आली.या प्रकरणात नाशिक उपसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने कथितपणे बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या माध्यमातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे.
या घोटाळ्याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, वेतन अधीक्षक आणि इतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपासात आतापर्यंत सुमारे १२०० आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

