Saturday, July 25, 2026
Homeजळगावबीएलओंच्या कामात हस्तक्षेप नको; तक्रारी अधिकाऱ्यांकडेच करा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

बीएलओंच्या कामात हस्तक्षेप नको; तक्रारी अधिकाऱ्यांकडेच करा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

बीएलओंच्या कामात हस्तक्षेप नको; तक्रारी अधिकाऱ्यांकडेच करा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मतदार यादी विशेष पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी लोकप्रतिनिधींना स्पष्ट शब्दांत सूचना देत, बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा थेट हस्तक्षेप करू नये, असे सांगितले. बीएलओंच्या कामाचा आढावा घेणे किंवा त्यांच्यावर दबाव टाकणे हे लोकप्रतिनिधींच्या अधिकारक्षेत्रात येत नसून, काही तक्रारी असल्यास त्या संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत काही लोकप्रतिनिधींनी काही बीएलओ नियमितपणे कामावर उपस्थित राहत नसल्याच्या, मोबाईल फोन बंद ठेवण्याच्या तसेच नागरिकांशी समन्वय साधत नसल्याच्या तक्रारी मांडल्या. यावर जिल्हाधिकारी घुगे यांनी प्रशासन अशा तक्रारी गांभीर्याने घेईल, मात्र नियमानुसार अधिकृत यंत्रणेकडे तक्रार दाखल करणे आवश्यक असल्याचे सांगितले. चौकशीत दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.मतदार यादीचे विशेष पुनरीक्षण हे निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील काम असल्याचे नमूद करत त्यांनी बीएलओंना राजकीय पक्षांच्या बॅनर, झेंडे किंवा राजकीय कार्यक्रमांच्या ठिकाणी शासकीय शिबिरे आयोजित करू नयेत, असे निर्देश दिले. मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती आणि पडताळणीची सर्व कामे केवळ निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या किंवा प्रशासनाने मंजूर केलेल्या केंद्रांवरच करण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.

निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आपापल्या अधिकारांच्या मर्यादेत राहून काम करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा लोकप्रतिनिधींना पूर्ण अधिकार असला, तरी निवडणूक यंत्रणेवर कोणताही थेट प्रभाव टाकण्याचा प्रयत्न टाळावा, असे त्यांनी स्पष्ट केले.बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बीएलओंच्या कामकाजावर नियमित देखरेख ठेवण्याच्या तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या