गुरुपौर्णिमेच्या पवित्र सणाला शासकीय सुट्टी आवश्यक – संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज


पाल ता रावेर: खान्देश लाईव्ह प्रतिनिधी आपले शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी, वर्षभर कामात व्यस्त असल्यामुळे अस्वस्थ होऊ लागतात. तथापि, गुरुपौर्णिमा हा दिवस ही अस्वस्थता दूर करण्याचा आणि गुरु व शिष्यामधील अतूट नाते दृढ करण्याचा आहे. त्यामुळे, गुरुपौर्णिमेच्या या पवित्र सणाला एक दिवसाची शासकीय सुट्टी देण्यात यावी, जेणेकरून त्यांना एक दिवस आपल्या गुरूंसोबत बसून शांतीचा अनुभव घेता येईल. राज्य आणि केंद्र सरकारचे सर्व सदस्य आणि मंत्री, तसेच संत समाजातील सर्व पीठाधिपती, संत आणि मान्यवरांनी आपापल्या भागातून हा मुद्दा राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे
सुचवले आहे. परमपूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम, श्री वृंदावन धाम, पाल येथे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सत्संग अमृताचा लाभ देताना, संस्थेचे अखिल भारतीय संत समाज समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष आणि पाल आश्रमाचे पदस्त श्रधेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी या मागणीसाठी उपस्थितांना संबोधित केले. परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या समाधी दर्शनाचा आणि श्रधेय महाराज जी च्या सत्संग अमृताचा लाभ घेण्यासाठी २९ जुलै रोजी देशभरातून अंदाजे एक लाखांहून अधिक चैतन्य साधक परिवार,भक्त पाल वृंदावन धाम आश्रमात जमले होते. मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक, रावेरचे आमदार अमोल जावळे, विधानपरिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन, इंदूरचे माजी आमदार सत्यनारायण पटेल, मुंबईचे
मुलचंद जैन, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार शिरीष चौधरी, झिरण्याच्या आमदार झुमा सोळंकी, नंदा ब्राह्मणे ताराचंद पटेल, माजी खासदार हरीभाऊ राठोड आदी उपस्थित होते.सर्वांनी मनोगत व्यक्त करतांना भक्तांना गुरुपौर्णिमेच्या सुट्टीची खात्री दिली. प्रशासनाच्या वतीने रावेर तहसीलदार दीपा जेधे, बडगुजर उप विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, रावेर गट विकास अधिकारी यांच्यासह मथुरा आश्रमाचे श्री हरिशरानंद जी महाराज, जामनेरचे श्री श्याम चैतन्य जी महाराज, श्री राधे चैतन्य जी महाराज, श्री ऋषी चैतन्य जी महाराज, श्री सर्व चैतन्य जी महाराज, श्री शुभ चैतन्य जी महाराज उपस्थित होते. फुलसिंग जाधव यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. पुढे, सत्संग अमृताचा वर्षाव करत,श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराजांनी दोन मानवी जन्मांचे थोडक्यात स्पष्टीकरण दिले. पहिल्या जन्मास बिंदूज जन्म, तर दुसऱ्या जन्मास जेव्हा साधकाला गुरूंकडून दीक्षा मिळते, त्याला नादज जन्म म्हणतात. गुरूंशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. ज्यांच्या स्मरणाने हृदय ज्ञानाच्या प्रकाशाने भरून जाते, ते गुरूंचे भाग्यवान शिष्य असतात. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु चरण पादुकांची पूजा केली जाते. त्यांनी भक्तांना संबोधित केले की, जो उपाय देतो आणि शंका दूर करतो तोच खरा गुरु आहे.
२९ जुलै रोजी, सकाळी ६ वाजल्यापासून श्री हरिधाम मंदिरात असलेल्या पूज्य बापूजी समाधी मंदिरात पादुका पूजन आणि समाधी दर्शन, गुरु दीक्षा, अभिषेक करण्यात आले. त्यानंतर, सकाळी १० वाजल्यापासून ध्यान, प्रार्थना, सत्संग, सेवा समिती सत्कार, अतिथी सत्कार आणि विद्यार्थी गुणगौरव सत्कार करण्यात आले.त्यानंतर महाआरती आणि महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

