एमडी तस्करीचे जाळे उघड; मालेगाव कनेक्शन समोर, एकाला अटक
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) तस्करीचा मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ६२.०७ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून अमली पदार्थांसह मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण ₹३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, ३१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एफसीआय गोडाऊनसमोरील परिसरात एलसीबीचे पथक गस्त घालत असताना संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका व्यक्तीची झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान त्याच्याकडे एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ आढळून आल्याने त्याला तात्काळ अटक करण्यात आली.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इम्रान खान हयात खान (वय ३६) असे असून तो मूळचा आडगाव (ता. जळगाव) येथील रहिवासी असून सध्या एमआयडीसी परिसरातील करीमनगर, फातिमा नगर येथे वास्तव्यास आहे.तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला एमडी हा रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याने विक्रीसाठी पुरवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.या कारवाईत पोलिसांनी एकूण ६२.०७ ग्रॅम एमडी (अंदाजे किंमत ₹२.८८ लाख), रिअलमी कंपनीचा मोबाईल (₹२० हजार) आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (₹५० हजार) असा एकूण ₹३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३५/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस फौजदार अतुल रघुनाथ वंजारी यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे पुढील तपास करीत आहेत.अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील ही कारवाई जिल्हा पोलिसांसाठी महत्त्वाची मानली जात असून, अशा प्रकारच्या अवैध कारवायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

