आंतरजातीय प्रेमविवाहाचा सूड; शालकाने मेहुण्याची दगडाने हत्या !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून शालकाने मेहुण्यावर दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रशांत सुभाष चौधरी (वय २६, रा. सुभाषनगर, फत्तेपूर) यांचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान ३१ जुलै रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी अभिषेक संतोष मोरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत चौधरी यांनी वडगाव सद्दो येथील अभिषेक मोरे याच्या बहिणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहाचा राग मनात धरून अभिषेक मोरे सूडाच्या संधीच्या शोधात होता.२७ जुलै रोजी सायंकाळी अभिषेकने प्रशांतला त्याच्याच दुचाकीवर बसवून तोरणाळे जंगल परिसरात नेले. तेथे दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच अभिषेकने प्रशांतच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. प्रशांतचा मृत्यू झाल्याचा समज करून आरोपीने त्याच्या अंगावर झाडांचा पाला टाकला आणि त्याची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.पोलिसांनी संशयाच्या आधारे आरोपीला त्याच रात्री ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत घटनास्थळ दाखवले. तेव्हा प्रशांत चौधरी हे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदूविकार तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच ३१ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी अभिषेक मोरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. मयताच्या नातेवाईकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव व त्यांचे पथक करीत आहे.

