आतेबहिणीच्या पतीला ड्रग्ज प्रकरणात अडकवून खंडणीचा कट; दोन आरोपींना पोलीस कोठडी
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पैशाच्या हव्यासापोटी स्वतःच्या आतेबहिणीच्या पतीला ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्याच्या कुटुंबाकडून मोठी रक्कम उकळण्याचा धक्कादायक कट रामानंदनगर पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि. २९ जुलै) पहाटे शिवकॉलनी परिसरात गस्तीदरम्यान रामानंदनगर पोलिसांना कल्पेश सतीष रायसिंग (वय २६, रा. भोदणी वालकी, ता. चोपडा) याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तपासणीदरम्यान त्याच्या दुचाकीच्या सीटखाली एमडी ड्रग्ज पावडर आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.तथापि, पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. कल्पेशने सांगितले की, त्याचा नातेवाईक जतीन रवींद्र सैंदाणे (रा. नांदेड, ता. धरणगाव) हा काही दिवसांपासून त्याला वारंवार जळगावला येण्याचा आग्रह करत होता. जळगाव येथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले आणि सीटखालून एमडी पावडर सापडली. ती तेथे कशी आली, याची त्याला कल्पना नसल्याचे त्याने सांगितले.तपासादरम्यान जतीन सैंदाणे हा शेअर मार्केटमध्ये मोठा आर्थिक तोटा झाल्याने कर्जबाजारी असल्याचे आणि त्याला एमडी ड्रग्जचे व्यसन असल्याचे समोर आले. तसेच, दुचाकीत ड्रग्ज असल्याची गोपनीय माहितीही त्यानेच पोलिसांना दिल्याचा संशय बळावला. चौकशीतून नातेवाईकाला ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्याच्या कुटुंबाकडून पैसे उकळण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात जतीन सैंदाणे आणि चंदन वानखेडे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोउपनि संजय तडवी तसेच रामानंदनगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.

