Thursday, August 13, 2026
Homeजळगावभुसावळ विभागात खानपान स्टॉलवर रेल्वेची करडी नजर; चार महिन्यांत ₹७.१० लाखांचा दंड

भुसावळ विभागात खानपान स्टॉलवर रेल्वेची करडी नजर; चार महिन्यांत ₹७.१० लाखांचा दंड

भुसावळ विभागात खानपान स्टॉलवर रेल्वेची करडी नजर; चार महिन्यांत ₹७.१० लाखांचा दंड

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
रेल्वे स्थानकांवरील खानपान स्टॉल, ट्रॉली विक्रेते आणि अधिकृत विक्रेत्यांकडून प्रवाशांची होणारी संभाव्य लूट रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारणे, विशेषतः पाण्याच्या बाटल्या व खाद्यपदार्थांसाठी MRP पेक्षा जास्त दर घेणे, अशा प्रकारच्या अनियमिततेविरोधात रेल्वे प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.
एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाने केलेल्या कारवाईत संबंधित विक्रेत्यांवर एकूण ₹७ लाख १० हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना निर्धारित दरात दर्जेदार खाद्यपदार्थ आणि पेये उपलब्ध करून देणे हे रेल्वे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी खानपान स्टॉल, ट्रॉली आणि अधिकृत विक्रेत्यांची नियमित तसेच आकस्मिक तपासणी केली जात आहे. प्रवाशांकडून रेल्वे मदतच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचीही दखल घेऊन संबंधित ठिकाणी तपासणी करण्यात येते.
तपासणीदरम्यान एखादा विक्रेता निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारताना किंवा अन्य व्यावसायिक अनियमितता करताना आढळल्यास, रेल्वेच्या नियमांनुसार तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. आर्थिक दंडाबरोबरच आवश्यकतेनुसार इतर शिस्तभंगाची कारवाईही केली जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांच्या हितांचे संरक्षण आणि ग्राहकांच्या अधिकारांचे जतन करण्यासाठी भुसावळ विभागाकडून नियमित देखरेख व आकस्मिक तपासणी सुरूच राहणार आहे. प्रवाशांकडून निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्यास किंवा अन्य कोणतीही अनियमितता आढळल्यास त्यांनी तातडीने रेल्वे मदतच्या माध्यमातून तक्रार नोंदवावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या