Thursday, August 13, 2026
Homeजळगावभुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश !

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश !

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश !

वैद्यकीय पदवी-नोंदणी नसतानाही रुग्णांवर उपचार; औषधे, इंजेक्शन्ससह वैद्यकीय साहित्य जप्त

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ शहरासह जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. वैद्यकीय पदवी किंवा वैध वैद्यकीय नोंदणी नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या उमेश मधुकर सपकाळे यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकवर पोलिस पथकाने छापा टाकला. यावेळी उमेश सपकाळे हे कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा वैध नोंदणी नसताना डॉक्टर म्हणून क्लिनिक चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, ते रुग्णांवर औषधे व इंजेक्शन्सद्वारे उपचार करत असल्याचेही आढळून आले.
प्रमाणपत्रांची तपासणी; वैद्यकीय साहित्य जप्त

पोलिसांनी सपकाळे यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासंदर्भातील आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर घटनास्थळावरून स्टेथोस्कोप, विविध प्रकारची औषधे, इंजेक्शन्स तसेच अन्य वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईचा पोलिसांनी पंचनामा केला असून, संबंधित व्यक्तीला पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधात धडक मोहीम – –
वैद्यकीय पदवी व वैध नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे. संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, १९६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
बोगस डॉक्टरांकडून होणाऱ्या उपचारांमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होण्याची शक्यता असल्याने पोलिसांच्या या कारवाईमुळे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या