Thursday, August 13, 2026
Homeजळगावअवैध पोटभाडेकरूंवर कारवाईसह मालमत्ता करात पारदर्शकतेची मागणी

अवैध पोटभाडेकरूंवर कारवाईसह मालमत्ता करात पारदर्शकतेची मागणी

अवैध पोटभाडेकरूंवर कारवाईसह मालमत्ता करात पारदर्शकतेची मागणी

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुलात वाढ करण्यासाठी व्यावसायिक मालमत्तांच्या कर आकारणीत पारदर्शकता आणावी, तसेच अवैध पोटभाडेकरार व अनधिकृत ताब्यांवर प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी मालमत्ता हक्क संघ, भुसावळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.संघाचे मुख्य संयोजक प्रशांतसिंह ठाकुर यांनी १० ऑगस्ट रोजी भुसावळ येथील उपविभागीय अधिकारी यांना याबाबत निवेदन दिले. हे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे विशेष शिफारशीसह पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.

जुन्या पगडी पद्धतीतील व्यावसायिक मालमत्तांच्या कर आकारणीत असलेल्या विसंगतींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचा दावा संघाने केला आहे. मालमत्ता कराची नोंद अधिकृत मालकाच्या नावाने करण्याची सक्ती, व्यावसायिक जागांमधील भोगवटादारांची नव्याने नोंदणी, आवश्यक ठिकाणी पोलीस पडताळणी आणि भाडेकरारांची अधिकृत नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मालकाच्या संमतीशिवाय तिसऱ्या व्यक्तीला व्यावसायिक जागा देण्यात आल्याच्या तक्रारींवर नगरपालिका, महसूल प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष पंचनामा व स्थळपाहणी करावी, अशीही मागणी आहे.
तसेच थकबाकी, अनधिकृत भोगवटा आणि करचुकवेगिरीच्या प्रकरणांत कायद्यानुसार दंडात्मक व सील कारवाईची स्पष्ट प्रक्रिया निश्चित करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक व विधवा मालमत्ता धारकांना अनधिकृत ताब्याच्या प्रकरणांत जलद प्रशासकीय संरक्षण मिळावे, यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मालमत्ता धारकांचे हक्क सुरक्षित ठेवतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांचा महसूल वाढविण्यासाठी शासनाने या प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ठाकुर यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या