बालकवी ठोंबरे यांच्या जयंतीनिमित्त भादली येथे ‘काव्य मैफिल’ आणि ‘डबा पार्टी’ उत्साहात संपन्न*..! भादली (जळगाव): खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी निसर्गाच्या अथांग सौंदर्याला आपल्या शब्दांतून अजरामर करणारे थोर निसर्ग कवी ‘बालकवी’ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी,१३ ऑगस्ट २०२६ रोजी भादली रेल्वे स्टेशन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यानिमित्त भव्य ‘काव्य मैफिल’ आणि साहित्यिक सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात संपन्न झाला.”औदुंबर ” ही कविता ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी लेवून निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून…..!सर्वांनी सामूहिकरीत्या म्हटली तसेच , ” श्रावण मासी हर्ष मानसी ” “ती फुलराणी ” यांचेही वाचन झाले..एखाद्या कुशल चित्रकाराने कुंचल्याच्या अवघ्या चार-सहा
फटकाऱ्यांसरशी एखादे सुरेख चित्र निर्माण करावे तद्वत अवघ्या आठ ओळीत बालकवींनी एक सुंदर निसर्गचित्र शब्दांच्या कुंचल्याने या कवितेत रेखाटलेले आहे.हे चित्र रंगविताना कवीने विविध रंग वापरलेले आढळते. निळासावळा झरा, शेतमळ्यांची हिरवी गरदी,पांढरी पायवाट व काळा डोह-मोजक्या रंगांनी शब्दांच्या चौकटीत बसविलेले हे एक साधे व जिवंत चित्र आहे. बालकवींची रंगदृष्टी येथे आपल्या प्रत्ययास येते.यासह कवींनी स्वरचित निसर्ग व सामाजिक आशयाच्या कविता सादर केल्या. लेवा गणबोली साहित्य मंडळ’ आणि ‘जिल्हा साहित्य व सांस्कृतिक मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला जिल्ह्यातील कवी, साहित्यिक, लेखक आणि निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सकाळी १०:३० वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात सुरुवातीला बालकवींच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले , याप्रसंगी कलावंत, कवी आणि कार्यक्रमाचे आयोजक तुषार वाघुळदे यांनी आपले विचार मांडले, ते म्हणाले, २०१८ साली अनेक साहित्यिक एकत्र येऊन भादली रेल्वे स्थानकावर स्मारकाच्या ठिकाणी बालकवींचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात यावा तसेच भादली रेल्वे स्टेशनच्या भिंतींवर निसर्गचित्र साकारण्यात यावे, स्मरकाजवळ एलईडी लाईटची व्यवस्था करण्यात यावी व बालकवी निसर्ग उद्यान उभारण्यात यावे , अशा मागणीसाठी आंदोलन करण्यात येऊन “रेल्वे रोको” केले होते.याबाबत दिवंगत खासदार हरिभाऊ जावळे, खासदार व केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व डी.आर. एम भुसावळ रेल्वे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते .मात्र पूर्तता झाली नाही याबाबतीत रेल्वे प्रशासनाची उदासीनता आहे असे सांगून उपस्थित साहित्यिकांनी खंत आणि नाराजी व्यक्त
केली.बालकवींचे काही काव्य गेय स्वरूपात असल्याने त्या गाण्यांचा अल्बम समजासमोर येण्यासाठी माझा प्रयत्न असेल असेही त्यांनी सांगितले. पत्रकार प्रसाद जोशी म्हणाले,” बालकवींच्या स्मृतीला उजाळा मिळावा यासाठी उपक्रम हाती घेऊ या ,जेणेकरून नव्या पिढीला तो ठेवा अजरामर ठेवण्यास मदत होईल. स्टेशन मास्तर हुकूमसिंग पाटील यांनी सांगितले की, आम्ही तसा प्रस्ताव पाठवला आहे लवकरच पूर्तता होईल अशी अपेक्षा आहे.नवीन बांधण्यात आलेल्या स्मारकाच्या काही फरशा निघाल्या असून बालकवींची प्रतिमा सुद्धा लावण्यात आलेली नाही..येथे आयोजित अभ्यासपूर्ण व्याख्यानांमधून वक्त्यांनी बालकवींच्या निसर्ग कवितांचा ठेवा आणि त्यांच्या साहित्यातील अमूल्य योगदान यावर प्रकाश टाकला. नंतर कवी संमेलन रंगले.याप्रसंगी कवी संमेलनात अनेक कवींनी आपल्या बहारदार कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.निसर्ग संवर्धन आणि समकालीन साहित्य या विषयावर झालेल्या चर्चासत्रात अनेक साहित्यिकांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. यात जेष्ठ साहित्यिक अरविंद नारखेडे, तुषार वाघुळदे, पत्रकार प्रसाद जोशी आणि रसिक-श्रोत्यांनी यांत सहभाग घेतला.काव्यमैफिलीत ॲड.राधिका ढाके, अरविंद नारखेडे,तुषार वाघुळदे, शीतल पाटील, सुधीर चौधरी,मयूर पाटील आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सांगतेनंतर झालेली अनोखी ‘डबा पार्टी’…! सर्व कवी आणि साहित्यिकांनी सोबत आणलेले जेवणाचे डबे एकत्र उघडून सहभोजनाचा आस्वाद घेतला.या डबा पार्टीमुळे कार्यक्रमात एक वेगळीच कौटुंबिक आणि आपुलकीची वीण निर्माण झाली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेवा गणबोली साहित्य मंडळाचे सचिव तुषार वाघुळदे, हभप गोपाळ ढाके, लेखक ए.के. नारखेडे सर आणि चीफ टी.एम.सी जयश्री तायडे ,टी आय.नवीन कुमार, वीरेंद्र जयस्वाल , उपप्रबंधक कुणाल शेगोकार ,नितीन नाईक ,भादलीच्या पोलीस पाटील ॲड. राधिका ढाके यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
आभार राधिका ढाके यांनी मानले..

