वरणगाव रेल्वे स्थानकावर साहित्य उघड्यावर; सुरक्षेअभावी चोरीचा धोका वाढला
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव, ता. भुसावळ :
भुसावळ तालुक्यातील वरणगाव रेल्वे स्थानकावर तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामासह विविध विकासकामांना सुरुवात झाली आहे. या कामांमुळे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात जुने भंगार, लोखंडी साहित्य तसेच नवीन बांधकाम व रेल्वे साहित्य उघड्यावर ठेवण्यात आले आहे. मात्र, या साहित्याच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने चोरीचा धोका निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
वरणगाव रेल्वे स्थानक परिसरात सध्या विविध कामे सुरू आहेत. तिसरी आणि चौथी लाईन टाकण्याच्या कामासोबतच स्थानक परिसरात इतरही विकासकामे केली जात आहेत. या कामासाठी आणण्यात आलेले नवीन साहित्य तसेच कामादरम्यान निघालेले जुने लोखंडी साहित्य व भंगार काही ठिकाणी उघड्यावर पडून असल्याचे चित्र आहे.
सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न – –
रेल्वेचे लोखंडी साहित्य, विविध उपकरणे आणि भंगार यांना बाजारात किंमत मिळत असल्याने अशा साहित्यावर चोरट्यांची नजर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे स्थानक परिसरात साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने त्याची नियमित देखरेख आवश्यक आहे. मात्र, स्थानक परिसरात खाजगी सुरक्षा रक्षक किंवा आरपीएफची पुरेशी उपस्थिती व नियमित गस्त दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. साहित्य चोरीला गेल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा चोरी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे उघड्यावर ठेवण्यात आलेल्या साहित्याची यादी तयार करून ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे, अशी मागणी होत आहे.

भुसावळच्या घटनेची पार्श्वभूमी —
दरम्यान, भुसावळ रेल्वे स्थानकातील भंगार चोरीच्या प्रकरणात खुनाची घटना घडल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे रेल्वे साहित्याच्या चोरीकडे केवळ किरकोळ घटना म्हणून न पाहता सुरक्षेच्या दृष्टीने गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. चोरीच्या घटनांमुळे रेल्वे प्रशासनाचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. दिवसा आणि रात्री येथे सुरक्षारक्षक, आरपीएफ दिसत नसल्याचे चित्र दिसत आहे .
प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात – –
वरणगाव रेल्वे स्थानकावर सुरू असलेली विकासकामे महत्त्वाची असून, कामाच्या ठिकाणी साहित्याची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. संबंधित कंत्राटदार आणि रेल्वे प्रशासनाने साहित्य ठेवण्यासाठी सुरक्षित जागा निश्चित करावी. रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून आवश्यक ठिकाणी अतिरिक्त कॅमेरे बसवावेत तसेच आरपीएफची नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
रेल्वे प्रशासनाने तातडीने पाहणी करून उघड्यावर पडलेले भंगार व नवीन साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे. तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून साहित्याच्या ये-जा करण्याची नोंद ठेवावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विकासकामांच्या काळात रेल्वेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असुरक्षित राहू नये आणि भविष्यात चोरीची घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वरणगाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

