शेळगाव बॅरेजवर सुरक्षारक्षकाने सहकाऱ्याचे डोके फोडले; पाटबंधारे विभागाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
भुसावळ/ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भुसावळ आणि यावल तालुक्याच्या सीमेवर जळगाव तालुक्यात असलेल्या शेळगाव बॅरेज येथे सुरक्षारक्षकानेच दुसऱ्या सुरक्षारक्षकाच्या डोक्यात मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. जखमी सुरक्षारक्षकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे शेळगाव बॅरेजवरील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित सुरक्षारक्षकांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, याचा तपास होणे गरजेचे आहे. डोके फोडणारा सुरक्षारक्षक यापूर्वीही वादग्रस्त ठरला आहे का, याची चौकशी करण्याची मागणी परिसरातून होत आहे.
दरम्यान, शेळगाव बॅरेज परिसरात रात्रंदिवस विविध वाहनांची ये-जा सुरू असते.या ठिकाणाहून अवैध धंद्यांशी संबंधित वाहतूक सुरू असल्याची चर्चा परिसरात होत असून, त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. बॅरेजसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर मानली जात आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस नेमकी कोणती कारवाई करतात, मारहाणी मागील कारण काय आहे आणि संबंधित सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेळगाव बॅरेजवरील सुरक्षाव्यवस्था, सुरक्षारक्षकांची नियुक्ती, त्यांची पार्श्वभूमी तसेच परिसरातील संशयास्पद वाहतुकीबाबत पाटबंधारे विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पोलीस आणि पाटबंधारे विभाग या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणार का? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

