Tuesday, August 18, 2026
Homeजळगाववरणगावात रस्त्याच्या भूमिपूजनावरून नवा वाद; लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळेंना पुन्हा डावलल्याची चर्चा

वरणगावात रस्त्याच्या भूमिपूजनावरून नवा वाद; लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळेंना पुन्हा डावलल्याची चर्चा

वरणगावात रस्त्याच्या भूमिपूजनावरून नवा वाद; लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळेंना पुन्हा डावलल्याची चर्चा
संबंधित प्रभागातील दोन नगरसेविकांनाही डावलल्याचा आरोप — सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              वरणगाव, ता. भुसावळ : वार्ताहर
वरणगाव नगरपालिका हद्दीतील सिद्धेश्वरनगर परिसरातील रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून शहरात नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते तसेच काही स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि प्रथम नागरिक सुनील काळे यांना या कार्यक्रमाची पूर्वसूचना अथवा रीतसर निमंत्रण देण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे.
विशेष म्हणजे ज्या प्रभागात हा भूमिपूजन कार्यक्रम झाला, त्या प्रभागातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या माला मिलिंद मेढे व तृप्ता समाधान महाजन दोन नगरसेविकांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे केवळ नगराध्यक्षांनाच नव्हे, तर संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधींनाही डावलण्यात आल्याची चर्चा वरणगाव शहरात रंगली आहे.
नगरपालिका हद्दीत होणाऱ्या सार्वजनिक विकासकामांच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे, त्यांना माहिती देणे आणि कार्यक्रमासाठी रीतसर निमंत्रित करणे ही लोकशाहीच्या दृष्टीने अपेक्षित बाब आहे. मात्र, सिद्धेश्वरनगर येथील रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्षांनाच निमंत्रण नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
यापूर्वीही कार्यक्रमांपासून दूर ठेवल्याचा आरोप
नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यापूर्वीही नगरपालिका हद्दीत झालेल्या काही महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला निमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावा केला आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या कार्यक्रमात तसेच शहरातील नागेश्वर महादेव मंदिराजवळील सभागृहाच्या उद्घाटनावेळीही आपल्याला निमंत्रण देण्यात आले नव्हते, असे काळे यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वरनगर येथील रस्त्याच्या भूमिपूजनासाठीही निमंत्रण न मिळाल्याने ही बाब आता अधिक चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षांना निमंत्रण नसतानाही राज्याचे मंत्री संजय सावकारे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने शहरातील राजकीय चर्चेला आणखी उधाण आले आहे.
‘नगराध्यक्षांना डावलणे म्हणजे जनतेचा अपमान’
याबाबत नगराध्यक्ष सुनील काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “संबंधित भूमिपूजन समारंभाचे मला कुठल्याही प्रकारचे औपचारिक निमंत्रण देण्यात आलेले नाही. यापूर्वीही वरणगाव शहरात नगरपालिका हद्दीत दोन कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमांनाही मला निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे मी त्या कार्यक्रमांना गेलो नाही.”
“वरणगावातील जनतेने मला लोकनियुक्त नगराध्यक्षपदी बसविले आहे. त्या जनतेशी माझी बांधीलकी आहे. कुणी बोलावले किंवा बोलावले नाही, म्हणून माझ्या विकासाच्या कार्यशैलीत काडीचाही फरक पडणार नाही. वरणगावकर जनतेच्या हितासाठी मी सदैव काम करीत आहे आणि यापुढेही करीत राहील,” असेही काळे यांनी स्पष्ट केले.
‘जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची धारणा’
काळे पुढे म्हणाले, “अलीकडच्या काळात वरणगाव शहरातील काही कार्यक्रमांच्या घटना पाहता, मला आता अशी धारणा झाली आहे की मला जाणीवपूर्वक कार्यक्रमांना बोलावले जात नाही. विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात होत आहेत. वरणगावकर जनतेने निवडणुकीतून बहुमताने निवडून दिलेला मी लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे.”
“त्यामुळे हा केवळ माझा अपमान नाही, तर मी ज्या जनतेचा लोकप्रतिनिधी आहे त्या जनतेचाही अपमान आहे. माझ्या जनतेचा अपमान करण्याचा जो कोणी कुटील डाव खेळत आहे, तो वरणगावकर जनतेला चांगलाच माहिती झाला आहे. अशा प्रवृत्तीला माझी मायबाप वरणगावकर जनता योग्य वेळी योग्य उत्तर देईल, असा मला ठाम विश्वास आहे,” असे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, नगरपालिका हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विकासकामांचे कार्यक्रम होत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकनियुक्त प्रमुखांना डावलण्याची वेळ का आली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शासकीय कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींच्या सहभागाबाबत असलेल्या प्रोटोकॉलचे पालन झाले का, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.
रस्ते, सभागृह, पाणीपुरवठा आणि इतर विकासकामे ही थेट नागरिकांच्या हिताशी संबंधित असतात. त्यामुळे अशा विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमांमध्ये राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींना समान वागणूक मिळावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
सिद्धेश्वरनगर येथील या भूमिपूजन कार्यक्रमामुळे वरणगावातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे असून, नगराध्यक्षांना निमंत्रण न देण्यामागे नेमके कारण काय, संबंधित प्रभागातील दोन नगरसेविकांना का वगळण्यात आले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यक्रमाची निमंत्रण प्रक्रिया कोणत्या पद्धतीने राबविली, याची उत्तरे आता चर्चेचा विषय बनली आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर सार्वजनिक बांधकाम विभागाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे विभागाकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे वरणगावकरांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या