मुख्याधिकाऱ्यांकडून मार्ग काढण्याचे आश्वासन
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – वरणगाव नगरपरिषदेच्या जुन्या बांधकाम परवानगी व सॅन्शन प्लॅनचे दप्तर उपलब्ध नसल्याच्या प्रकाराविरोधात अमोल रामदास पाटील यांनी मंगळवारी (१ सप्टेंबर) नगरपरिषदेच्या गेटजवळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकदिवसीय उपोषण सुरू केले. लोकशाही मार्गाने सुरू केलेल्या या उपोषणाला नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.
पाटील यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घराची सन २००८ मध्ये काढण्यात आलेली बांधकाम परवानगी व सॅन्शन प्लॅनची प्रमाणित प्रत मिळावी, यासाठी ते ९ मार्च २०२६ पासून नगरपरिषद प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, नगरपरिषद प्रशासनाकडून तत्कालीन कागदपत्रे व संबंधित दप्तर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.जावक क्र. ४२९/११/११/२००८ या बांधकाम परवानगी व प्लॅनची प्रमाणित प्रत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. संबंधित दप्तर गहाळ कसे झाले, ते कोणी गहाळ केले किंवा ते चोरीला गेले का, याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.वरणगाव शहरातील मोठ्या प्रमाणावर बांधकाम परवानग्या या ग्रामपंचायत काळातील असल्याचे सांगत, “माझे दप्तर उपलब्ध नसेल तर अशा इतर नागरिकांच्या कागदपत्रांचे काय?” असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून जुन्या अभिलेखांचे जतन व उपलब्धता याबाबत नगरपरिषद प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.उपोषणस्थळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल भोये यांनी भेट देऊन पाटील यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणात योग्य तो मार्ग काढण्याचे तोंडी आश्वासन त्यांनी दिले.
उपोषणस्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, वाय. आर. पाटील, चंद्रकांत बढेसर, सचिन माळी, अशफाक काझी , दिपक मराठे , मनोज देशमुख , उत्तम इंगळे , डॉ पी .व्ही पाटील , नगरसेविका तृप्ता महाजन, नगरसेवक राजेंद्र चौधरी, निलेश चौधरी,रवी सोनवणे यांच्यासह विविध नागरिकांनी भेट देऊन पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला.दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाकडून समाधानकारक निर्णय न झाल्यास पुढील टप्प्यात बेमुदत उपोषण तसेच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अमोल पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे या दप्तर गहाळ प्रकरणात नगरपरिषद प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.