Friday, September 18, 2026
Homeजळगावखानदेशच्या परंपरा-संस्कृतीचा अभ्यासपूर्ण दस्तऐवज; ‘खानदेश परंपरा आणि संस्कृती’ ग्रंथाचे प्रकाशन

खानदेशच्या परंपरा-संस्कृतीचा अभ्यासपूर्ण दस्तऐवज; ‘खानदेश परंपरा आणि संस्कृती’ ग्रंथाचे प्रकाशन

खानदेशच्या परंपरा-संस्कृतीचा अभ्यासपूर्ण दस्तऐवज; ‘खानदेश परंपरा आणि संस्कृती’ ग्रंथाचे प्रकाशन

खानदेश लाईव्ह न्यूज नेटवर्क | विशेष प्रतिनिधी

खानदेशच्या समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि ज्ञानपरंपरेचे विविध पैलू अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणाऱ्या डॉ. दीपक शिरसाठ लिखित ‘खानदेश परंपरा आणि संस्कृती’ या ग्रंथाचे प्रकाशन आदरणीय कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मानव्य विद्या विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील तसेच विद्यापीठात कार्यरत इतिहास संशोधक डॉ. नरसिंह परदेशी उपस्थित होते.

भारतीय समाज हा प्राचीन काळापासून ज्ञानप्रिय राहिला असून, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाच्या विविध टप्प्यांमध्ये भारतीय समाजजीवन आणि संस्कृतीचे स्वतंत्र वैशिष्ट्य अधोरेखित होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर ‘प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली’ या विषयाला शिक्षणक्षेत्रात नव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. या व्यापक संदर्भात डॉ. शिरसाठ यांनी खानदेशातील परंपरा आणि संस्कृतीचा घेतलेला अभ्यास विशेष महत्त्वाचा ठरतो.

खानदेश हा भौगोलिकदृष्ट्या तुलनेने लहान प्रदेश असला, तरी त्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अत्यंत समृद्ध आहे. या ग्रंथात खानदेशातील ऐतिहासिक साधने, पुरातत्त्वीय अवशेष आणि पुराभिलेखीय संदर्भांचा अभ्यासपूर्ण उपयोग करण्यात आला आहे. पारंपरिक सण-उत्सव, यात्रा-जत्रा, सामाजिक रूढी, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक जीवनाचा सविस्तर आढावा या ग्रंथातून घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, खानदेशातील प्राचीन परंपरांचे वर्तमानातील महत्त्व तसेच त्यांचा भविष्यातील संदर्भ यांचा विचार लेखकाने केला आहे. भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास केवळ आध्यात्मिक किंवा धार्मिक चौकटीपुरता मर्यादित न ठेवता, तिच्या इहवादी आणि भौतिक पायाचाही अभ्यास होणे आवश्यक आहे, असा दृष्टिकोन या ग्रंथातून मांडण्यात आला आहे.

वसाहतवादी काळात भारतीय समाजजीवनातील व्यापकता, एकसंघता, समानता आणि सांस्कृतिक समन्वयाच्या अनेक घटकांकडे दुर्लक्ष झाले. या पार्श्वभूमीवर भारतीय ज्ञानपरंपरेचा वस्तुनिष्ठ आणि व्यापक दृष्टिकोनातून पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मे २०२६ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘Indian Knowledge Systems: A Primer’ या ई-पुस्तकाच्या पार्श्वभूमीवरही डॉ. शिरसाठ यांच्या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित होते.

या ग्रंथात भारतीय ज्ञान-संस्कृतीतील विविध घटकांची खानदेशातील स्थानिक परंपरांशी सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संदर्भसाधनांचा पुरेपूर वापर, वस्तुनिष्ठ मांडणी, प्रादेशिक भाषेचा अभ्यास आणि विशेषतः अहिराणी भाषेचा उल्लेख व उपयोग ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये असल्याचे मानले जात आहे.

खानदेशच्या सांस्कृतिक वारशाचे दस्तऐवजीकरण करणारा हा ग्रंथ केवळ उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांसाठीच नव्हे, तर राज्यातील तसेच देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये भारतीय ज्ञानपरंपरा, लोकसंस्कृती आणि प्रादेशिक इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या ग्रंथाच्या माध्यमातून खानदेशच्या इतिहासाकडे आणि सांस्कृतिक वारशाकडे नव्या अभ्यासपूर्ण दृष्टीने पाहण्याची संधी उपलब्ध झाली असून, भारतीय ज्ञानपरंपरेच्या व्यापक अभ्यासाला प्रादेशिक इतिहासाची भक्कम जोड मिळणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या