पूर्णाड फाट्यावर राखेचे तीन ओव्हरलोड डंपर; आरटीओच्या कारवाईची प्रतीक्षा
पत्रकारांनी माहिती देऊनही तीन तास कारवाई नाही; कर्की चेकपोस्ट जवळ असूनही आरटीओ विभागाच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
पूर्णाड फाट्याजवळ क्षमतेपेक्षा अधिक राख वाहतूक करणारे तीन डंपर पत्रकारांनी थांबवून ठेवले. या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ विभागाला माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे कर्की चेकपोस्ट घटनास्थळापासून काही अंतरावर असतानाही माहिती देऊन तब्बल तीन तास उलटल्यानंतरही आरटीओ विभागाचे अधिकारी कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले नसल्याचे समोर आले आहे.
पत्रकारांनी स्वतः कर्की चेकपोस्टवर जाऊन आरटीओ विभागाला वाहनांची माहिती दिली. मात्र त्यानंतरही कारवाई न झाल्याने आरटीओ विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. क्षमतेपेक्षा अधिक तसेच आवश्यक परवानग्यांशिवाय राख वाहतूक होत असल्याच्या तक्रारी असताना संबंधित विभागाकडून तातडीने कारवाई होणे अपेक्षित असताना एवढा विलंब का झाला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

थांबविण्यात आलेल्या डंपरचे क्रमांक RJ 09 GF 1355, MP 12 ZK 9970 आणि RJ 09 JE 6083 असे आहेत. या वाहनांवर नियमांनुसार कागदपत्रे, वाहनाची क्षमता व राख वाहतुकीची परवानगी यांची तपासणी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
आरटीओ विभागाला प्रत्यक्ष माहिती देऊनही अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने अवैध अथवा ओव्हरलोड राख वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याबाबत विभाग किती गंभीर आहे, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. संबंधित वाहनांवर अखेर कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

