गणेशोत्सव सण शांततेत उत्साहाने साजरा करा – जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आवाहन .
रावेर, तालुका खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि विसर्जन मिरवणुकीचे नियोजन यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यंदा २३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात येणार असून, प्रत्येक मंडळाशी समन्वय राखण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रावेर दौऱ्यात गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. गणेशोत्सव नियमात राहून करण्याचे आवाहन केले आहे . यावेळी मराठा मंगल कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत विविध शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
उत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन सतर्क राहणार असल्याचे श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले. शांतता बिघडविणाऱ्या किंवा अनुचित प्रकार करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
गणेश मंडळांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि पोलिस प्रशासनाशी थेट संपर्क ठेवण्यासाठी प्रत्येक मंडळासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. उत्सवादरम्यान काही समस्या उद्भवल्यास संबंधितांनी प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीत विशेषतः विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे, नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळणे यासाठी पोलीस दलाकडून आवश्यक बंदोबस्त करण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यंदा २३ सार्वजनिक गणपतींची स्थापना होणार आहे. सर्व मंडळांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
विसर्जन मिरवणुकीत पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीचा अवलंब करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ध्वनीप्रदूषण टाळणे, वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आणि मिरवणुकीदरम्यान शिस्त राखणे, याबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांपासून नागरिकांनी सावध राहावे, असेही बैठकीत सांगण्यात आले. कोणतीही संशयास्पद घटना अथवा वस्तू आढळल्यास तातडीने पोलिस प्रशासनाला माहिती देऊन नागरिकांनी सुरक्षाव्यवस्थेत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सव हा सामाजिक एकोप्याचा उत्सव असल्याने सर्व समाजघटकांनी एकमेकांच्या भावना जपत उत्सवात सहभागी व्हावे, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. शांतता समिती, गणेश मंडळे, नागरिक आणि विविध शासकीय विभाग यांच्या समन्वयातून यंदाचा गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्याचा निर्धार करण्यात आला. मंडळ कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोलिस विभागातर्फे देण्यात आली .
बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, नायब तहसीलदार श्री. साळी, पोलीस उपनिरीक्षक सखाराम कांबळे, मनोज महाजन, गटविकास अधिकारी विनोद मेडे, माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, उपनगराध्यक्ष आसीफ मोहम्मद, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी यांच्यासह विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य आणि शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.

