संगीत ध्यान साधना व्यक्तिमत्त्व विकासाचे बहुविध पैलू विकसित करण्याचे साधन’
प्रा. डॉ. शलाका निकम
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि भुसावळ येथील कला, विज्ञान व पुनमचंद ओंकारदास नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘आत्मनिर्भर युवती’ उपक्रमांतर्गत संगीत ध्यान साधना आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील होते. प्रमुख वक्त्या म्हणून संगीत विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. शलाका निकम उपस्थित होत्या. व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. विलास सोळुंके आणि बँकिंग विभागप्रमुख डॉ. किरण वारके उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शलाका निकम म्हणाल्या, “संगीत ध्यान साधना ही देश, धर्म आणि जात निरपेक्ष असून संपूर्ण जगभर व्यक्तिमत्त्व विकास आणि आरोग्यासाठी तिचा वापर केला जातो. संगीत हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून रोजगारनिर्मितीक्षम क्षेत्रदेखील आहे. त्यातून व्यक्ती आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते.”
पुढे त्या म्हणाल्या, “व्यक्तिमत्त्व ही बहुविध संकल्पना आहे. मानसिकदृष्ट्या आनंदी आणि सक्षम राहण्यासाठी विद्यार्थिनींनी संगीत ध्यान साधनेचा अवलंब करावा. त्यातून ताण-तणाव कमी करण्यास तसेच कार्यक्षमतेत वाढ करण्यास मदत होते.”
अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील यांनी संगीत आणि मानवी जीवनाचा संबंध अतिशय पुरातन असल्याचे सांगितले. मानवी जीवनातील विविध प्रसंगी संगीताचा आवर्जून वापर केला जातो. तसेच संगीत थेरपीमुळे मानवाला उपचारपद्धतीचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. विलास सोळुंके यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. हर्षा पाटील हिने केले. पाहुण्यांचा परिचय कु. कोमल पाटील हिने करून दिला, तर आभार प्रदर्शन कु. कुणाली कचवे हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुणवंत पाटील, अक्षय चौधरी, मानसी, प्रतीक्षा पवार आणि अनुष्का आंबेकर या विद्यार्थ्यांसह प्रा. डॉ. जितेंद्र आडोकार, प्रा. सुनील अडकमोल आणि प्रा. जोगेश्वरी पाटील यांनी परिश्रम घेतले.

