Thursday, September 3, 2026
Homeजळगावनागपूर-भुसावळ विभागातील रेल्वे सुविधांबाबत खासदारांची महाव्यवस्थापकांसोबत बैठक

नागपूर-भुसावळ विभागातील रेल्वे सुविधांबाबत खासदारांची महाव्यवस्थापकांसोबत बैठक

नागपूर-भुसावळ विभागातील रेल्वे सुविधांबाबत खासदारांची महाव्यवस्थापकांसोबत बैठक

नागपूर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
नागपूर येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर व भुसावळ विभागातील माननीय खासदारांची बैठक बुधवारी पार पडली. नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील ‘समाधान’ कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत रेल्वेच्या विविध विकासकामांसह प्रवाशांच्या सुविधा आणि मतदारसंघनिहाय मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, वर्ध्याचे अमर काळे, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा सुरेश धानोरकर, बैतूलचे दुर्गादास उईके, छिंदवाड्याचे बंटी विवेक साहू, दिंडोरीचे भास्कर मुरलीधर भगारे, जळगावच्या खासदार स्मिता उदय वाघ, अकोल्याचे अनुप संजय धोत्रे, अमरावतीचे बळवंत बसवंत वानखेडे, खंडव्याचे ज्ञानेश्वर पाटील तसेच राज्यसभा खासदार अनिल बोंडे उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी उपस्थित खासदारांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी मध्य रेल्वेच्या विविध क्षेत्रातील कामगिरीची माहिती दिली. उपमहाव्यवस्थापक के. के.मिश्रा यांनी बैठकीचे कामकाज पाहिले.

नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग आणि भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी आपापल्या विभागातील रेल्वेच्या कामगिरीचे सविस्तर सादरीकरण केले. रेल्वेच्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांची माहिती यावेळी खासदारांना देण्यात आली.
खासदारांनी आपल्या मतदारसंघातील रेल्वे सुविधांशी संबंधित विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. स्थानकांचा पुनर्विकास, तिसरी व चौथी रेल्वे मार्गिका, अमृत भारत स्थानक योजना, नवीन रेल्वेगाड्या तसेच वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस आणि विशेष गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मध्य रेल्वेकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे खासदारांनी कौतुक केले. बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना रेल्वे प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली. तसेच, रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रवाशांच्या सुविधा वाढविण्यासाठी खासदारांनी केलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यांचा समावेश करण्याचे आश्वासन महाव्यवस्थापकांनी दिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या