Friday, September 4, 2026
Homeआरोग्यमुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची वसंतवाडी येथे अंगणवाडीस भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची वसंतवाडी येथे अंगणवाडीस भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची वसंतवाडी येथे अंगणवाडीस भेट

बालकांच्या सर्वांगीण विकासासह कुटुंब व समुदायाच्या सहभागावर भर

जळगाव.  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, यांनी जळगाव प्रकल्पांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत वसंतवाडी येथील अंगणवाडी केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन (ECD) कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे उपस्थित होते.
भेटीदरम्यान श्रीमती नायर यांनी अंगणवाडी केंद्रातील बालकांचे वजन व उंची स्वतः प्रत्यक्ष मोजून त्यांच्या पोषणस्थितीचे Normal, SAM, MAM, SUW, MUW आदी निकषांनुसार वर्गीकरण करून घेतले. बालकांच्या वाढीचे नियमित मोजमाप, योग्य वर्गीकरण आणि त्यानुसार वेळेत आवश्यक हस्तक्षेप करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वसंतवाडी येथील बालकांमध्ये Stunting चे प्रमाण कमी असल्याचे पाहणीत निदर्शनास आले. ही सकारात्मक स्थिती कायम ठेवण्यासोबतच Stunting चे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक व आवश्यक त्या उपचारात्मक स्वरूपाचे सातत्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या सूचना श्रीमती नायर यांनी दिल्या. बालकांच्या शारीरिक वाढीसोबतच त्यांच्या बौद्धिक, भावनिक, सामाजिक व भाषिक विकासावरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. (ECD) कार्यक्रम हा केवळ अंगणवाडी केंद्रापुरता मर्यादित न राहता कुटुंब व समुदायाच्या सक्रिय सहभागातून प्रभावीपणे राबविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. अंगणवाडी केंद्रातील भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिश्मा नायर यांनी गरोदर महिला व स्तनदा मातांसोबत खाली बसून अत्यंत आपुलकीने संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांच्या आहार, आरोग्य, स्तनपान, बालसंगोपन तसेच बालकांच्या वाढ व विकासासंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या. अधिकारी व लाभार्थी यांच्यातील औपचारिक अंतर बाजूला ठेवून प्रत्यक्ष लाभार्थींच्या पातळीवर जाऊन संवाद साधल्यामुळे महिलांनीही मोकळेपणाने आपल्या समस्या व गरजा मांडल्या. बालकांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात योग्य पोषण, कुटुंबाचा सक्रिय सहभाग आणि वेळेवर आवश्यक सेवा उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे श्रीमती नायर यांनी सांगितले. CBE अंतर्गत बालकांच्या संगोपनात वडील, आजी-आजोबा तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचा सहभाग वाढविण्याबाबत श्रीमती नायर यांनी विशेष सूचना केल्या. बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण आणि भावनिक विकासाची जबाबदारी केवळ आईची नसून संपूर्ण कुटुंबाची आहे. हा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

पोषण ट्रॅकर व Nurture ॲपद्वारे प्रभावी सनियंत्रण

श्रीमती नायर यांनी पोषण ट्रॅकर ॲपवरील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच Nurture ॲपमध्ये VCDC अंतर्गत नोंद असलेल्या कुपोषित बालकांच्या सनियंत्रणाची स्थितीही तपासली. कुपोषित व जोखमीतील बालकांची नियमित माहिती घेऊन त्यांच्या प्रगतीनुसार आवश्यक हस्तक्षेप करण्यात यावा. उपलब्ध डिजिटल माहितीचा प्रभावी वापर करून बालकांच्या पोषणस्थितीत अपेक्षित सुधारणा घडवून आणावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. क्षेत्रभेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नायर यांनी जिल्हा परिषद शाळेसही भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. ‘निपुण’ ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता तपासून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत संबंधित शिक्षकांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करावेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रगतीवर विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीमती नायर यांनी गावातील महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक सुविधा, अडचणी व गरजा जाणून घेतल्या. उपलब्ध संधींचा प्रभावी उपयोग करून बचत गटांनी विविध व्यवसाय व उत्पन्नवाढीचे उपक्रम हाती घ्यावेत, यासाठी त्यांनी महिलांना प्रोत्साहित केले.
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी आणि स्थानिक उपलब्ध संसाधनांवर आधारित उद्योग-व्यवसाय विकसित करावेत, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांशी थेट संवाद साधून समस्या जाणून घेतल्या
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या व स्थानिक गरजा जाणून घेतल्या. बालकांच्या संगोपनात आईसोबत वडिलांचाही सक्रिय सहभाग वाढविणे, बालकांना योग्य पोषण व विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच गावकऱ्यांनी बालविकासाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

संवेदनशील आणि परिणामाभिमुख प्रशासनाचा प्रत्यय
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर यांची वसंतवाडी येथील क्षेत्रभेट ही केवळ प्रशासकीय पाहणीपुरती मर्यादित न राहता बालकांचे प्रत्यक्ष पोषण मूल्यांकन, (ECD) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा, डिजिटल ॲपच्या माध्यमातून सनियंत्रण, शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी, गरोदर व स्तनदा मातांशी थेट संवाद, महिला बचत गटांना प्रोत्साहन तसेच ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेणारी सर्वसमावेशक क्षेत्रभेट ठरली.
“सुदृढ बालक – सक्षम कुटुंब – स्वावलंबी महिला – सहभागी समुदाय” या उद्दिष्टातून जळगाव जिल्ह्यात महिला व बालविकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही भेट महत्वाचे पाऊल ठरली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या