घरफोडी करणारा आरोपी काही तासांत जेरबंद
चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई; ४९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील देशमुखवाडा, जुनी नगरपालिका परिसरात घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांनी काही तासांत जेरबंद केले. आरोपीकडून चोरी गेलेला सुमारे ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.मनिषा रामराव सूर्यवंशी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. यावेळी २.५ ग्रॅम सोन्याचे नाणे, १५ भार चांदीच्या साखळ्या व ९ हजार रुपये रोख, असा एकूण ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी निलेश मनोज सोनार (वय २५, रा. जुनी नगरपालिका जवळ, देशमुखवाडा, चाळीसगाव) याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची पोलिसांनी माहिती दिली.आरोपीकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन आगोने करीत आहेत.कारवाईत पोहेकॉ योगेश बेलदार, पोहेकॉ नितीन आगोने, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील, अशोक मोरे व दत्तू सावळे यांनी सहभाग घेतला.

