Sunday, September 6, 2026
Homeजळगाववरणगावच्या भूमिगत गटार योजनेला शासनाची मंजुरी! ८२ कोटींच्या प्रस्तावाला हिरवा कंदील; सांडपाण्याचा...

वरणगावच्या भूमिगत गटार योजनेला शासनाची मंजुरी! ८२ कोटींच्या प्रस्तावाला हिरवा कंदील; सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची आशा

वरणगावच्या भूमिगत गटार योजनेला शासनाची मंजुरी!
८२ कोटींच्या प्रस्तावाला हिरवा कंदील; सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची आशा
वरणगाव :    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       — वरणगाव शहरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रस्तावित भूमिगत गटार प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. सुमारे ८२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने वरणगावकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भूमिगत गटार योजना मंजूर व्हावी यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी गेल्या सात महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सात वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन वरणगाव शहरासाठी भूमिगत गटार योजना मंजूर करण्याची मागणी केल्याचे काळे यांनी सांगितले. मंत्री गिरीश महाजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुनेत्रा पवार तसेच मंत्री संजय सावकारे यांच्याकडेही यासाठी पाठपुरावा करण्यात आला.
नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी केशव जाधव यांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून वरणगाव शहरातील भूमिगत गटार प्रकल्पाला मान्यता दिली आहे. महाराष्ट्र नागरी पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्पांतर्गत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मंजुरीनंतर सुधारित प्रकल्पाचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता लवकर मिळवून प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले.
भूमिगत गटार योजनेमुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न सुटण्यासह अस्वच्छता आणि दुर्गंधीपासून नागरिकांची सुटका होण्याची अपेक्षा आहे. या योजनेच्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री सुनेत्रा पवार, मंत्री संजय सावकारे व मंत्री गुलाबराव पाटील यांचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जाहीर आभार मानले.
“वरणगावच्या भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही,” असा निर्धारही नगराध्यक्ष काळे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या