साकेगावातील रेशन दुकान क्रमांक २ वर ‘केवायसी’बाबत संभ्रम
अंतिम मुदतीबाबत वेगवेगळी माहिती; नागरिकांकडून पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी साकेगाव, ता. भुसावळ : शासनाच्या निर्देशानुसार सध्या राज्यभर शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू असून ती लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. मात्र, साकेगाव येथील रेशन दुकान क्रमांक २ वर केवायसीच्या अंतिम मुदतीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी नागरिक व देशदूत प्रतिनिधींना ७ सप्टेंबर ही अंतिम तारीख असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शनिवारी सकाळी दुकानात केवायसीसाठी गेलेल्या नागरिकांना आजच अंतिम तारीख असल्याचे सांगण्यात आल्याने अनेक नागरिकांची धावपळ उडाली.
साकेगाव येथे रेशनची तीन दुकाने असून त्यापैकी दुकान क्रमांक २ हे सरला कोटेजा यांच्या नावावर असल्याचे सांगण्यात येते. हे दुकान भाडेतत्त्वावर चालविले जात असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी नागरिकांनी दुकानावर जाऊन केवायसीची अंतिम तारीख जाणून घेतली असता त्यांना ७ सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया करता येईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे काही नागरिकांनी त्यानुसार नियोजन केले.
दरम्यान, राखीच्या निमित्ताने गावातील काही नागरिक व कुटुंबे बाहेरगावी गेली आहेत. अशा परिस्थितीत अचानक अंतिम मुदत आज असल्याचे सांगण्यात आल्याने संबंधित नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. काही नागरिकांनी याबाबत देशदूत प्रतिनिधींशी संपर्क साधल्यानंतर दुकानावर प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यावेळी दुकानदारानेही ‘वरून आदेश असल्याने आज अंतिम तारीख आहे’, अशी माहिती दिल्याचे सांगण्यात आले.
यानंतर पुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आजच अंतिम तारीख असल्याचे सांगण्यात आले. बाहेरगावी गेलेल्या नागरिकांबाबत विचारणा केली असता, केवायसी कोणत्याही रेशन दुकानावर करता येते, अशी माहिती देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात दुसऱ्या गावातील रेशन दुकानदार स्थानिक लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच बाहेरील गावातील नागरिकांची केवायसी करणार का,? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धान्याच्या प्रमाणाबाबतही तक्रारी
दरम्यान, दुकान क्रमांक २ बाबत यापूर्वीही नागरिकांकडून धान्य कमी मिळणे, वेळेवर धान्य न मिळणे? यासंदर्भात तक्रारी झाल्याचे सांगण्यात येते. याबाबत दुकानदाराकडे विचारणा केली असता ‘वरूनच कमी धान्य आले’, असे उत्तर मिळत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. साकेगावमध्ये तीन रेशन दुकाने असताना इतर दुकानांना नियमित व पुरेशा प्रमाणात धान्य मिळत असेल, तर दुकान क्रमांक २ बाबतच वारंवार कमी किंवा उशिरा पुरवठा का होतो, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
बचत गटाच्या महिलांकडे दुकान देण्याची मागणी
रेशन दुकानाच्या कामकाजाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करून नागरिकांना नियमित, वेळेवर आणि नियमानुसार धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. तसेच, दुकानाच्या कारभाराची संबंधित विभागाने सखोल चौकशी करून आवश्यक असल्यास गावातील स्थानिक महिला बचत गटाला रेशन दुकान चालविण्याची संधी द्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
केवायसीच्या अंतिम मुदतीबाबत स्पष्ट आणि अधिकृत सूचना नागरिकांना देण्यात यावी, तसेच रेशन दुकानाच्या धान्यपुरवठ्याची तपासणी करून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी अपेक्षा साकेगावकरांकडून व्यक्त होत आहे.

