चोरट्यांचा धुमाकूळ ! भरदिवसा घराचे कुलूप तोडून २.५७ लाखांचा ऐवज लंपास
पारोळा खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील खेडीढोक येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपये रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी (दि. ५) घडली. सकाळी ११ ते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खेडीढोक येथील शेतकरी सुपडू नारायण पाटील हे पत्नीसमवेत शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजता घराला कुलूप लावून चिखलोड शिवारातील शेतात कामासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.चोरट्याने स्वयंपाकघरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड तसेच अॅल्युमिनियमच्या डब्यात ठेवलेले २३ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. दागिन्यांसह चोरी गेलेल्या एकूण ऐवजाची किंमत २ लाख ५७ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुपडू पाटील व त्यांची पत्नी शेतातील काम आटोपून घरी परतले. त्यावेळी घराच्या दरवाजाचे कुलूप उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घराची पाहणी केली असता रोकड व सोन्याचे दागिने गायब असल्याचे समोर आले. त्यांनी तत्काळ पारोळा पोलिसांशी संपर्क साधला.याप्रकरणी सुपडू पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अमळनेर येथील फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले.
पोलिसांनी पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे खेडीढोक परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी होत आहे.

