Monday, September 7, 2026
Homeगुन्हाबनावट कागदपत्रांच्या आधारे ३ कोटी ७२ लाखांची फसवणूक; हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरून गुन्हा...

बनावट कागदपत्रांच्या आधारे ३ कोटी ७२ लाखांची फसवणूक; हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरून गुन्हा !

बनावट कागदपत्रांच्या आधारे ३ कोटी ७२ लाखांची फसवणूक; हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरून गुन्हा !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तिसऱ्या मजल्यावरील बांधकामाला परवानगी मिळाल्याचे भासविणारी कथित बनावट कागदपत्रे दाखवून तसेच ताब्यात दिलेल्या जागेचा परस्पर इतर व्यक्तींशी व्यवहार करून हॉटेल व्यावसायिक व इस्टेट ब्रोकर सुरेश नंदलाल तलरेजा (वय ६३, रा. गणपती नगर) यांची तब्बल ३ कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे.या प्रकरणी तलरेजा यांच्या फिर्यादीवरून रविवारी (दि. ६ सप्टेंबर) शहर पोलिस ठाण्यात के.पी. इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोप्रायटर ममता अनिल साहित्या, अनिल खूबचंद साहित्या, खुबचंद प्रेमचंद साहित्या, नितीन खूबचंद साहित्या, जयराम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स प्रा. लि. तसेच विशाल रामगोपाल शर्मा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, साहित्या कुटुंबीयांनी संत बाबा हरदासराम शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावरील बांधकामासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांच्या सही व शिक्क्याची कागदपत्रे दाखविली. बांधकामास परवानगी असल्याचा विश्वास निर्माण करून तलरेजा यांच्याकडून रोख तसेच बँक व्यवहाराद्वारे रक्कम स्वीकारण्यात आली.यानंतर सौदापावती आणि लेखी ताबा पावती देऊन संबंधित जागेचा प्रत्यक्ष ताबाही तलरेजा यांना देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यांनी त्या जागेवर इस्टेट ब्रोकरचे कार्यालय व रीडिंग रूम सुरू करण्यासाठी मोठा खर्च केला.दरम्यान, आपल्या ताब्यात असलेल्या मिळकतीचा परस्पर इतर व्यक्तींशी व्यवहार झाल्याची माहिती तलरेजा यांना जुलै २०२६ मध्ये मिळाली. त्यानंतर त्यांनी महापालिकेत चौकशी केली असता संबंधित व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत बांधकामास परवानगी नसल्याचे समोर आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी शहर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या