Tuesday, September 8, 2026
Homeजळगावरेशनच्या तांदळाच्या संशयित काळाबाजाराचा पर्दाफाश?; राईस मिलवर मध्यरात्री धाड !

रेशनच्या तांदळाच्या संशयित काळाबाजाराचा पर्दाफाश?; राईस मिलवर मध्यरात्री धाड !

रेशनच्या तांदळाच्या संशयित काळाबाजाराचा पर्दाफाश?; राईस मिलवर मध्यरात्री धाड !

तहसीलदार व पुरवठा विभागाची संयुक्त कारवाई; तांदळाचे नमुने व कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात

पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील बरखंडी येथील सावखेडा रस्त्यावरील ‘महासर माता राईस मिल’वर तहसीलदार आणि पुरवठा विभागाच्या पथकाने ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री अचानक धाड टाकून तपासणी केली. भडगाव परिसरात रेशनचा ट्रक पकडल्यानंतर या मिलशी संबंधित बाबी प्रशासनाच्या तपासाच्या केंद्रस्थानी आल्याची माहिती आहे.

मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत मिलमधील तांदळाच्या साठ्याची पाहणी करण्यात आली. तसेच आवक-जावक नोंदवही आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. पथकाने तांदळाचे विविध नमुने ताब्यात घेऊन ते पुढील अधिकृत तपासणीसाठी पाठविल्याची माहिती आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांसाठी उपलब्ध होणारा तांदूळ बेकायदेशीररीत्या गोळा करून त्यावर प्रक्रिया करून खुल्या बाजारात विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, संबंधित तांदूळ रेशन व्यवस्थेतीलच आहे की नाही, हे अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.दरम्यान, परिसरात तांदळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत नसताना या ठिकाणी राईस मिलला परवानगी कशी मिळाली, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिलची परवानगी, धान्याचा स्रोत, वाहतूक व्यवस्था तसेच खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

तांदळाच्या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल आणि प्रशासनाच्या पुढील चौकशीतून या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. केवळ मिलपुरती कारवाई न करता धान्याचा पुरवठा करणारे संभाव्य वाहतूकदार, मध्यस्थ आणि संबंधित साखळीचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या