पूर्ववैमनस्याचा भडका; शहरातील चिकन विक्रेत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला !
डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर वार; बचावासाठी धावलेल्या मुलगा-पुतण्यालाही मारहाण
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – पूर्वीच्या वादातून निर्माण झालेल्या वैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला केल्याची गंभीर घटना शहरातील बी. जे. मार्केट परिसरात रविवारी रात्री घडली. गोपाल मधुकर चौधरी असे जखमी विक्रेत्याचे नाव असून त्यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोपाल चौधरी यांची बी. जे. मार्केट परिसरात चिकनची हातगाडी आहे. यापूर्वी त्यांचा सुनिल रसाळ राठोड याच्याशी वाद झाला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोपाल चौधरी हे नेहमीप्रमाणे हातगाडीवर असताना संशयित सुनिल राठोड तेथे आला. त्याच्या हातात कोयता व लाकडी दांडुका असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांत पूर्वी तक्रार केल्याच्या रागातून त्याने चौधरी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.या हल्ल्यात चौधरी यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर वार झाले. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांचा मुलगा आणि पुतण्या मदतीला धावून आले असता त्यांनाही दांडक्याने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर संशयित दुचाकीवरून घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगण्यात आले.
जखमी चौधरी यांना प्रथम जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.पुतण्या सचिन चौधरी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सुनिल रसाळ राठोड (रा. कांचननगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरून पुरावे संकलित केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

