जळगाव जिल्ह्यातील मुस्लिम खाटीक समाजाचा आदर्श – म्हसावद येथे कमी खर्चात, साधेपणाने निकाह संपन्न
एरंडोल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी नागदुली म्हसावद, ता. एरंडोल, जि. जळगाव
मुस्लिम खाटीक समाजाने पुन्हा एकदा समाजापुढे साधेपणाचा आदर्श ठेवला आहे.
आज दि. ७ सप्टेंबर २०२५, रविवार रोजी मौजे नागदुली / म्हसावद, ता. एरंडोल, जि. जळगाव येथे एक आगळा-वेगळा आणि कौतुकास्पद आदर्श विवाह संपन्न झाला.
मूळ एरंडोलचे व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेले मुश्ताक हाजी मुनाफ खाटीक यांचे चिरंजीव सोहेल यांच्यासाठी नागदुली / म्हसावद येथील जनाब शेख इक्बाल अब्दुल सत्तार खाटीक यांची कन्या रोजमीन बानो हिच्याशी साखरपुडा व रिश्ता पक्का करण्यासाठी दोन्ही परिवार एकत्र आले होते.
मात्र, त्याच ठिकाणी दोन्ही परिवारातील समजदार आणि दूरदृष्टी असलेल्या ज्येष्ठ मान्यवरांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. दिखावा, अनावश्यक खर्च आणि _मुलीच्या हातात पैसे देऊन साखरपुडा करण्याची जुनी प्रथा_ मोडीत काढत, त्याच दिवशी, त्याच ठिकाणी अत्यंत साधेपणाने आणि इस्लामी पद्धतीने निकाह करण्याचा निर्णय घेतला. आणि तो अल्लाहच्या कृपेने यशस्वीरित्या पार पडला.
खाटीक समाजातील अनावश्यक खर्च टाळावा, निकाह सुलभ आणि सुन्नत पद्धतीने व्हावा यासाठी समाजातील ज्येष्ठ मंडळी गेल्या अनेक दिवसांपासून जनजागृती करत आहेत. त्यांच्या अथक परिश्रमाचे हे गोड फळ असून, आजच्या तरुण पिढीपुढे हा विवाह एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.
या आदर्श आणि साध्या निकाहबद्दल अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाज, जळगाव जिल्हा यांच्यावतीने दोन्ही परिवाराचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. नवनाथ दाम्पत्याच्या भावी जीवनात कायम प्रेम, विश्वास आणि सलोखा राहो, अशी दुआ देण्यात आली आहे.
या स्तुत्य उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, इतर समाजबांधवांनीही याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

