ब्रेकिंग – पैशांसाठी वृद्ध महिलेचा गळा आवळून खून; घरगडी तरुणाला अटक


रावेर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील दोधा येथे पैशांच्या मागणीसाठी ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा बेल्टने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेमुळे दोधा परिसरात खळबळ उडाली आहे. ललिताबाई वसंत पाटील (वय ७२, रा. दोधा) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या घरी सालदार म्हणून काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला रावेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.लाला धर्मा भिलाला (वय १९, रा. प्रकाश पाटील यांचा वाडा, दोधा, ता. रावेर; मूळ रा. नसिराबाद बोरी, ता. नेपानगर, जि. बुऱ्हाणपूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, लाला भिलाला हा ललिताबाई पाटील यांच्या घरी सालदार तथा घरगडी म्हणून काम करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. तिने पुन्हा नांदण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले आहे. पैसे न दिल्यास दुसरे लग्न करण्याची धमकी दिल्याने आरोपीवर पैशांसाठी दबाव निर्माण झाला होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.गुरुवारी दुपारी सुमारे १.३० वाजेच्या सुमारास आरोपी घराच्या मागील बाजूने घरात शिरला. त्यावेळी घरात एकट्या असलेल्या ललिताबाई यांचा त्याने स्वतःच्या बेल्टने गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील तसेच कानातील दागिने काढून आरोपी घटनास्थळावरून निघून गेला.खून केल्यानंतरही आरोपीने नेहमीप्रमाणे वावरत कोणतीही घटना घडली नसल्याचा आव आणल्याचे तपासात समोर आले. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याचा शोध घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीने लपवून ठेवलेले दोन गळ्यातील हार तसेच कानातील दागिने पोलिसांनी हस्तगत केले असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलिसांकडून सुरू असून, खुनाचा नेमका घटनाक्रम, आरोपीचा उद्देश आणि या घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास करण्यात येत आहे.

