केळी पीकविमा ट्रिगर प्राप्त लाभार्थी महसूल मंडळांची यादी तातडीने जाहीर करा.
यावल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिला
आंदोलनाचा इशारा.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२४ पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत केळी पिकासाठी पात्र ठरलेल्या महसूल मंडळांची यादी तातडीने जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ विमा परतावा मिळवून द्यावा आणि असे न झाल्यास यावल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष
आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
यावल तालुका शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की जळगाव जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरवला आहे.सदर योजनेचा अधिकृत विमा संरक्षण कालावधी ३१ जुलै २०२६ रोजी संपुष्टात आला असून, नियमानुसार विमा कालावधी संपल्यापासून ४५ दिवसांच्या आत हवामानाच्या ट्रिगरनुसार पात्र ठरणाऱ्या महसूल मंडळांची यादी घोषित होणे अपेक्षित होते. मात्र, कालावधी उलटूनही प्रशासनाकडून अधिकृत यादी जाहीर न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संभ्रम व असंतोष निर्माण झाला आहे.
केळी उत्पादक शेतकरी आधीच विविध नैसर्गिक संकटांमुळे व आर्थिक अडचणींनी ग्रासलेले आहेत.अशा स्थितीत विमा परतावा वेळेत न मिळाल्यास त्यांच्यासमोरील आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यास्तव, यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील हवामान निर्देशांकानुसार पात्र ठरलेल्या सर्व महसूल मंडळांची यादी पुढील ४ ते ५ दिवसांत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने तातडीने जाहीर करण्यात यावी.तसेच नवीन व जुन्या महसूल मंडळांमधील हवामान केंद्रांवर नोंदवले गेलेले तापमान,वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यमान याबाबतची सर्व माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात यावी.याशिवाय, अवेळी पाऊस व हवामानातील बदलांमुळे अडचणीत आलेल्या केळी उत्पादकांना विमा भरपाई देण्यास टाळाटाळ किंवा विलंब करणाऱ्या विमा कंपनीवर प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी,अशीही मागणी निवेदनात समाविष्ट करण्यात आली आहे.
प्रशासन व संबंधित विमा कंपनीने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न केल्यास यावल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील, तालुका प्रमुख शरद भाऊ कोळी,माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक अतुल भाऊ पाटील,शहरप्रमुख जगदीश कवडीवाले,संतोष धोबी, नगरसेवक सागर चौधरी,
नगरसेवक पराग सराफ, नगरसेवक वैशाली ताई बारी, कडू पाटील,योगेश पाटील, योगेश चौधरी,सारंग बेहेडे,सुनिल जोशी आर.के.चौधरी,किशोर माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

