Monday, September 28, 2026
Homeजळगावउड्डाणपुलावरून पडून ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू !

उड्डाणपुलावरून पडून ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू !

उड्डाणपुलावरून पडून ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू !

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलावर दुचाकी कठड्याला धडकल्याने पुलावरून खाली पडलेल्या ज्योतिषाचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. विजय घनश्याम भार्गव उर्फ विजू महाराज (वय ४५, रा. केशवनगर, अमळनेर) असे मृताचे नाव आहे.

विजय भार्गव हे मुलीसोबत मोटरसायकल क्रमांक एमएच १९ बीई १०२९ वरून शहरातून केशवनगरकडे जात होते. प्रताप तत्त्वज्ञान केंद्राजवळ अज्ञात वाहनाचा कट लागल्याने त्यांची दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात भार्गव पुलावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर भार्गव काही काळ जखमी अवस्थेत घटनास्थळी पडून होते. त्यांची मुलगी घटनास्थळी रडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, प्रताप महाविद्यालयाचे कर्मचारी प्रविण डबेलकर तसेच भार्गव यांच्या पत्नी घटनास्थळी पोहोचल्या. त्यांच्या मदतीने जखमी भार्गव यांना एपे रिक्षातून डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.यानंतर मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई व एक मुलगी असा परिवार आहे. ते ज्योतिषकार पन्नालाल भार्गव यांचे पुतणे होते.

वेळीच मदत मिळाली असती तर?

या अपघातानंतर जखमी भार्गव हे सुमारे १० ते १५ मिनिटे घटनास्थळी पडून असल्याची माहिती समोर आली आहे. पुलावरून अनेक जण त्यांना पाहत होते, मात्र तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातग्रस्तांना त्वरित मदत व उपचार मिळणे किती महत्त्वाचे आहे, हा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या