Friday, October 2, 2026
Homeगुन्हामहिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणाऱ्या तिघांना एलसीबीकडून अटक १ लाख २५ हजारांचा...

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणाऱ्या तिघांना एलसीबीकडून अटक १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणाऱ्या तिघांना एलसीबीकडून अटक
१ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
रिक्षेत बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तिघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नशिराबाद परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास भुसावळ येथे बाजार करून महिला पायी घरी जात होत्या. दगडी पुलाजवळील म्हसोबा मंदिराजवळ एक रिक्षा त्यांच्या जवळ आली. रिक्षाचालकाने घरी सोडण्याचे बहाणा करून त्या रिक्षेत मागील बाजूस बसल्या. यावेळी रिक्षेतील दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील अंदाजे अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली.
या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २००/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तांत्रिक तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता ते नशिराबाद परिसरातील मुकेरिया हॉटेलजवळ आढळून आले.
पोलिसांनी वसीम शेरअली तेली (३८, रा. फातेमा नगर, एमआयडीसी, जळगाव), अरबाज खान अय्युब खान (२६, रा. शिवाजीनगर चौक, जळगाव) आणि वसीम अजमल खान (३६, रा. साती मजार, नशिराबाद) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यांच्याकडून अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल व काळे मणी असलेले मंगळसूत्र (किंमत २५ हजार रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेली तीनचाकी रिक्षा क्रमांक एमएच-१९-व्ही-६५६३ (किंमत १ लाख रुपये) असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, वसीम शेखअली तेली याच्याविरुद्ध एमआयडीसी व रामानंदनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच वसीम अजमल खान याच्याविरुद्धही एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोहेकॉ अकरम शेख, किशोर पाटील, संदीप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी व राहुल वानखेडे यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या