जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात
१६ संघांचा सहभाग; अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलने पटकावला प्रथम क्रमांक

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१ क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव तसेच जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या स्पर्धेत मुलांच्या १४ वर्षांखालील गटातील तब्बल १६ संघांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. दीपमालाताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतराव पोळ होते.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दिनानाथ भामरे (मनपा क्रीडा अधिकारी), जयांशू पोळ (सहसचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन), माजी खेळाडू डॉ. तुषार राणे, सौ. विद्या कलंत्री (खजिनदार, जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशन), दिलीप सूर्यवंशी (राज्यस्तरीय पंच) तसेच सौ. सरस्वती पाटील (क्रीडा शिक्षिका) यांची उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना क्रीडा क्षेत्रात सातत्य, शिस्त, संघभावना आणि जिद्द यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले. खो-खो या पारंपरिक भारतीय खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि सांघिक भावना विकसित होत असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. डी.सोनवणे सर यांनी केले, तर आभार विशाल पाटील यांनी मानले.स्पर्धेचे यशस्वी आयोजन सुरेश थरकुडे (क्रीडा अधिकारी) व राहुल पोळ (सचिव, जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशन, जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून विशाल पाटील, गोपाळ पवार, छगन मुखडे, कमलेश पावरा, केतन चौधरी, मोहित गुंजकर, हिमांशू पाटील, हर्षल बेडीसकर व प्रथमेश कंखरे यांनी उत्कृष्टपणे काम पाहिले.
स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी व गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनीच्या खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल — १४ वर्षांखालील मुले*
प्रथम क्रमांक — अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव*
द्वितीय क्रमांक — श्रीराम माध्यमिक विद्यालय, जळगाव*
तृतीय क्रमांक — आर. आर. विद्यालय, जळगाव*
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या खेळाच्या प्रदर्शनामुळे संपूर्ण स्पर्धेच्या मैदानावर क्रीडाप्रेम, उत्साह आणि चुरशीचे वातावरण निर्माण झाले होते.

