Friday, October 2, 2026
Homeजळगावजिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत गो.पु. पाटील विद्यालयाची दमदार कामगिरी

जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत गो.पु. पाटील विद्यालयाची दमदार कामगिरी

जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत गो.पु. पाटील विद्यालयाची दमदार कामगिरी

तीन खेळाडूंची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड

कोळगाव, ता. भडगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगावच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची प्रभावी छाप उमटवत तीन सुवर्ण कामगिरी नोंदविली आहे. १७ वर्षांआतील मुलींच्या दोन वजनगटांत तसेच मुलांच्या एका वजनगटात विद्यालयाच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवित नाशिक विभागीय शालेय ज्युडो स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.

जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत १७ वर्षांआतील मुलींच्या गटात तनु वाल्मीक पाटील हिने ५२ किलोखालील वजनगटात, तर दिव्या भानुदास पाटील हिने ७० किलोखालील वजनगटात प्रतिस्पर्ध्यांवर मात करून प्रथम स्थान पटकावले. त्याचप्रमाणे १७ वर्षांआतील मुलांच्या गटात प्रेम सूर्यभान जाने याने ५५ किलोखालील वजनगटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

या तिन्ही खेळाडूंची आता यशवंत स्टेडियम, नाशिक येथे होणाऱ्या नाशिक विभागीय शालेय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरावर मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगतीला आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे.

मेहनत, कौशल्य आणि जिद्दीला यश

ज्युडो हा खेळ ताकद, चपळता, तंत्र, आत्मविश्वास आणि मानसिक एकाग्रतेची कसोटी पाहणारा खेळ मानला जातो. या सर्व गुणांचा योग्य समन्वय साधत गो.पु. पाटील विद्यालयाच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली. नियमित सराव, शिस्तबद्ध तयारी आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे खेळाडूंना हे यश संपादन करता आले.

विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या परंपरेत या यशाची भर पडली असून, कुस्ती, खो-खो, वेटलिफ्टिंग यांसह विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने जिल्हा व विभागीय स्तरावर चमकत आहेत. ज्युडोमधील या यशामुळे विद्यालयातील क्रीडा संस्कृतीला अधिक बळ मिळाले आहे.

या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा आदर्श क्रीडा शिक्षक बी. डी. साळुंखे, ज्येष्ठ शिक्षक प्रा. रघुनाथ अरविंद पाटील तसेच राष्ट्रीय खो-खो पंच प्रा. प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. पुनमताई पाटील, मंत्रालयीन उपसचिव दादासाहेब प्रशांतराव पाटील, विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. वळखंडे, पर्यवेक्षक बी. डी. साळुंखे, प्रभारी कार्यवाहक मनोजकुमार पवार, ज्येष्ठ शिक्षक प्रा. रघुनाथ अरविंद पाटील, प्रा. प्रेमचंद चौधरी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या तनु वाल्मीक पाटील, दिव्या भानुदास पाटील आणि प्रेम सूर्यभान जाने या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विभागीय स्तरावरही हे खेळाडू आपल्या खेळाची चमक दाखवतील, असा विश्वास क्रीडाप्रेमी व विद्यालय परिवाराने व्यक्त केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या