उत्तर प्रदेशात ५० हजारांचे बक्षीस असलेला फरार आरोपीला भुसावळमध्ये अटक
घोडे पीर बाबा दर्ग्याजवळ पोलिसांची सापळा रचून कारवाई; संयुक्त पथकाची कामगिरी

भुसावळ खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील सन २०२० मधील घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आणि विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या इरफान या आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. भुसावळ शहरातील घाडे पीर बाबा दर्ग्याजवळ ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या इरफान याचा शोध सुरू होता. तो भुसावळमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), डीबी पथक आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. घाडे पीर बाबा दर्ग्याजवळ त्याचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
इरफान याच्याविरुद्ध उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या अटकेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडून ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अखेर संयुक्त पथकाच्या नियोजनबद्ध कारवाईमुळे त्याला भुसावळमध्ये पकडण्यात यश आले.
ताब्यात घेतलेल्या इरफान याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी दिली.
या कारवाईमुळे फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध राज्यांतील पोलिसांमध्ये समन्वय किती महत्त्वाचा आहे, हे सिद्ध झाले आहे.

